शिवभोजन थाळीच्या संख्येत दुप्पट वाढ
शिवभोजन योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने या योजनेचा विस्तार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाला दिल्या होत्या त्यानुसार आता या योजनेतील थाळीच्या संख्येत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. ही संख्या १८ हजारांवरुन ३६ हजार थाळी इतकी झाली आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने यासंबंधीचा शासननिर्णय आज जाही केला आहे. यानुसार सध्या प्रत्येक शिवभोजन केंद्रासाठी असलेले किमान ७५ आणि कमाल १५० थाळींचे उद्दिष्ट मागणीनुसार वाढवून किमान ७५ आणि कमाल २०० थाळी इतके वाढवता येईल.
राज्यात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरु केली होती. पहिल्या दिवसापासूनच योजनेला राज्यातील गोरगरिब जनतेने उदंड प्रतिसाद दिला. पहिल्या टप्प्यात केवळ शासकीय कार्यालये, रुग्णालये बस आणि रेल्वे स्थानके, बाजारपेठा यासारख्या सार्वजनिक ठिकाणीच योजना राबविली जात असली तरी भविष्यात योजनेचा आणखी विस्तार करण्याचे नियोजित आहे. १८ फेब्रुवारी रोजी १४८ केंद्रावर १६ हजार २३७ लोकांनी शिवभोजन योजनेतील थाळीचा अस्वाद घेतल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, केंद्राची निवड पूर्वीच्याच पद्धतीने करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने १ जानेवारी २०२० च्या शासननिर्णयान्वये केंद्राची निवड करण्याची पद्धत निश्चित करून दिली आहे. याचपद्धतीने पुढेही केंद्राची निवड करण्याची सूचना करण्यात आली असून केंद्राची प्रतिदिन थाळीची संख्या आता आवश्यकतेनुसार २०० च्या मर्यादेत वाढवता येईल.