DRDOकडून पुण्यात मानवविरहीत बोटीची यशस्वी चाचणी
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO)पुण्यात दूरून नियंत्रित केली जाणारी मानवविरहित सशस्त्र तीन बोटींची यशस्वी चाचणी घेतली. शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच गस्त घालण्यासाठी ही बोट उपयुक्त आहे. गुजरातमधील गांधीनगर येथे 18 ते 22 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या 12व्या डिफेक्सपो 2022च्या आधी ही चाचणी घेण्यात आली.
या बोटीवर मानव नसल्याने नियंत्रण ठेवण्यासाठी ग्राउंड कंट्रोल स्टेशनकडे व्हिडीओ फीड ट्रान्सफर केले जाईल. सागरी सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी या बोटींचा वापर केला जाईल. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत शत्रूचा मुकाबला करण्यासाठी बोटीवर शस्त्रेही बसवण्यात आली आहेत, अशी माहिती डीआरडीओच्या संशोधन आणि विकास आस्थापनेचे समूह संचालक पी एम नाईक यांनी दिली. भामा-आसखेड धरणावर ही चाचणी घेण्यात आली.
डीआरडीओने विकसित केलेल्या या बोटीचे अद्याप नामकरण करण्यात आलेले नाही. शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा या बोटीवरी दूर बसून रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रण ठेवण्यात आले. तथापि, ही बोट भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात कधी समाविष्ट केली जाईल, हे सांगण्यात आले नाही.
डीआरडीओची ही मानवविरहित बोट इलेक्ट्रिक तसेच मोटर इंजिनवर चालते आणि एका वेळी पाण्यात 24 तास सतत गस्त घालू शकते. ही बोट शत्रूंपासून वाचवण्यासाठी डीआरडीओने विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ही बोट शत्रूंच्या हाती लागली तर, त्यातील कंट्रोल बोर्ट आपोआप नष्ट होतील. त्यामुळे कोणतीही गोपनीय माहिती किंवा महत्त्वपूर्ण डेटा शत्रूला मिळणार नाही. देशाच्या सागरी हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शत्रूचा, कंट्रोल रूममध्ये बसून एका बटणावर खात्मा करू शकतो. ही बोट पूर्णपणे भारतीय बनावटीची असून सागर डिफेन्स इजिनिअरिंग कंपनीने डीआरडीओसह ती विकसित केली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor