बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 नोव्हेंबर 2018 (15:40 IST)

राज्यात आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांना विद्यार्थ्यांसाठी ड्रेसकोड

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांना विद्यार्थ्यांसाठी ड्रेसकोड असणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेला येताना अर्ध्या बाहीचा व फिक्या रंगाचा शर्ट किंवा टी शर्ट, फुल पॅन्ट, चप्पल असा ड्रेसकोड निश्चित करण्यात आला आहे. यातून धार्मिक व परंपरेशी संबंधित पेहरावाला सवलत देण्यात आली आहे. दि. २७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षांसाठी हा ड्रेसकोड लागु होणार आहे.
 
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई)ने नीट परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी ड्रेसकोड निश्चित केलेला आहे. त्याचे पालन न करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात नाही. हीच पध्दत आता आरोग्य विज्ञान विद्यापीठाने स्वीकारली आहे. विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या एमबीबीएस, बीडीएस यांसह विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी ड्रेसकोड बंधनकारक करण्यात आला आहे. राज्यात पहिल्यांदाच एखाद्या विद्यापीठाने अशाप्रकारे ड्रेसकोड ठरविला आहे.
 
असा असेल ड्रेसकोड
- अर्ध्या बाहीचे, फिक्या रंगाचे शर्ट किंवा टी-शर्ट आणि फुल पॅन्ट. मुलींना यासह साडी किंवा सलवार कमीजही चालेल.
- शर्टला छोटे बटन असावे. नक्षीदार बटन नसावे. 
- अंगठी, गळ्यातील साखळी यांसह कुठल्याही प्रकारचे दागिने (मंगळसुत्र वगळून) घातला येणार नाही. 
- घड्याळ, मोबाईल किंवा कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण नसावे.
- अप्रन, टोपी, गॉगल, पर्स, हार, चेन, पीन, हँड बॅग आदी वस्तु वापरता येणार नाहीत.
- पायात चप्पल/स्लीपर असावी. बुट नसावेत.