1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (08:00 IST)

श्री चक्रधर स्वामींच्या दूरदृष्टीमुळेच आज स्त्री-पुरुष समानतेचे युग – केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार

All India Mahanubhava Samela Dr. Pawar visited
श्री चक्रधर स्वामींच्या दूरदृष्टीमुळेच आज स्त्री – पुरुष समानतेचे युग दिसते, महिलांना आज सर्व क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळते आहे, कारण स्वामींनी त्या काळात समतेची युग निर्माण केले होते. श्री चक्रधरस्वामींनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिलांना दर्शनाचा, भक्तीचा अधिकार मिळाला पाहिजे. हा विचार स्वामींची दुरदृष्टी दर्शवितो. कारण, याच विचारांचा परिणाम म्हणजे अष्टशताब्दी जन्मोत्सव सोहळ्याला संपूर्ण देशभरातून येथे उपस्थित झालेल्या नारीशक्तीचे दर्शन आपल्याला घडत आहे. असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी येथे केले.
 
अखिल भारतीय महानुभाव संमेलनास डॉ.  पवार यांनी भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार बाळासाहेब सानप, दत्ता गायकवाड, प्रकाश घुगे, प्रकाश नन्नावरे, प्रभाकर भोजने, शितल सांगळे, औरंगाबाद येथील नागराजबाबा उर्फ आत्याबाई आदींसह देशभरातून आलेले संत-महंत, कवी व्यासपीठावर होते. आयोजन समितीचे दिनकर (अण्णा) पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या संमेलनात मंगळवारी (ता. ३०) ठरावाद्वारे मांडण्यात येणाऱ्या सात मागण्यांचा उल्लेख करून त्यांनी मंत्री डॉ. पवार यांना निवेदन दिले.
 
डॉ. पवार म्हणाल्या की, देशाला आत्मनिर्भर बनविण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने कोरोना काळापासून आतापर्यंत तब्बल २११ कोटी व्हॅक्सिनेशन पूर्ण करून एवढा मोठा टप्पा गाठणारा भारत पहिला देश ठरला आहे. तसेच, भारतिय संस्कृतीचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. देशाच्या आत्मगौरवात साधु-संतांचे योगदान मोठे आहे. जेथे जाल तेथे साधु-संतांचे आशिर्वाद घ्या असे पंतप्रधान मोदी नेहमी सांगत असतात. त्यामुळे या संमेलनाच्या आयोजनातून आणि येथे येण्याची संधी मिळाली यामुळे नाशिककर म्हणून आपण धन्य झालो आहोत. त्याचप्रमाणे गुरूंच्या आदेशाप्रमाणे जीवनात आचरण केल्यास आयुष्यात कधीच ननिराशा येणार नाही, असेही त्यांनी या वेळी नमुद केले. प्रा. माधुरी पेठकर यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान. महानुभाव पंथातील राज्यभरातील आलेल्या अनेक कवींनी काव्य संमेलनात श्री चक्रधर स्वामींच्या जीवनावर आधारित तसेच महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानावर आधारित आपआपल्या कविता यावेळी सादर केल्या.