1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (20:20 IST)

‘या’ कारणामुळे केला डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून ??

murder
गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक महानगर पालिकेच्या डॉक्टर सुवर्णा वाजे यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलीस तपास करत आहे.या खून प्रकरणी अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी संदीप वाजे याची सात दिवसांची पोलीस कोठडी शुक्रवारी संपली होती.
 
शुक्रवारी इगतपुरी न्यायालयात हजार केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हत्येप्रकरणी गजाआड असलेले संशयित संदीप वाजे तपासात सहकार्य करीत नसल्याची बाब पोलिस विभागाने न्यायालयासमोर मांडली. पुरावे, साथीदार व तांत्रिक विश्‍लेषणासाठी कोठडी देण्यात यावी, अशी विनंती सरकारी वकील जयदेव रिके यांनी न्यायालयास केली. पोलिस तपासातील प्रगती अपूर्ण राहिलेल्या बाबी लक्षात घेत न्यायालयाने संशयित संदीप यास चार दिवसांची पुन्हा पोलिस कोठडी दिली.
 
शुक्रवार (ता. ११) रोजी दुपारी तीन वाजता इगतपुरी सत्र न्यायालयात संशयित संदीप वाजे यास तपासी अधिकारी अनिल पवार यांनी हजर केले. न्यायालयात निरीक्षक पवार व सरकारी वकील रिके यांनी तपासाबाबतची माहिती दिली. संशयिताची चौकशी केली असता व पोलिस तपासातील माहितीच्या आधारे मिळून आलेल्या पुराव्याचा तपशील सांगताना घटनास्थळी कारमध्ये मिळून आलेला चाकू. चाकू गाडीत ठेवण्याचा उद्देश काय होता, याचा तपास पोलिस करीत आहेत. मयताने केलेली मोबाईल चॅटिंग मोबाईलमधून डिलीट केली असून संशयिताचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे डाटा रिकव्हर करण्यासाठी पाठविण्यात आला आहे.
 
मोबाइलमधील चॅट का डिलीट केली याचे उत्तर संशयित आरोपीला देता आले नाही. संशयिताच्या मोबाईलमध्ये मयतास शिवीगाळ करतांनाचा व्हिडिओ मिळून आला आहे. या व्हिडिओमध्ये डॉ. सुवर्णा वाजे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारे शब्द वापरण्यात आले आहेत. आरोपीच्या नावाने लिहिलेल्या चिठ्ठीत आरोपी दुसरे लग्न करण्यासंदर्भात उल्लेख केलेला आढळुन आला असतांना दुसरे लग्न करण्यासाठी डॉ. वाजे ह्यांचा अडथळा संशयीत आरोपीस असल्याचे निदर्शनास येत असल्याचे संबंधीत घटना क्रम पाहता स्पष्ट होते.