शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 जून 2021 (13:37 IST)

ई-बिलिंग प्रणालीमुळे म्हाडा व गाळेधारकांमधील संबंध दृढ होणार – जितेंद्र आव्हाड

म्हाडा सदनिकांच्या वितरणाकरिता संगणकीय सोडत प्रणालीची अत्यंत पारदर्शक सुरवात करून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) पारदर्शक व सुलभ प्रशासनाचा आदर्श घालून दिला आहे व आता सेवाशुल्क भरण्याकरिता ई-बिलिंग संगणकीय प्रणाली कार्यरत करून नागरिक केंद्रित प्रशासनाचे उत्तम 
उदाहरण दिले आहे. या सेवेमुळे मुंबईतील लाखो नागरिकांना घरबसल्या सेवाशुल्क अदा करता येणार आहे तसेच अभय योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या गाळेधारकांकरीता देखील या प्रणाली अंतर्गत सेवाशुल्क भरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या प्रणालीमुळे म्हाडा व नागरिकांमधील जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ होईल, असा विश्वास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला.
 
यावेळी आव्हाड म्हणाले, राज्य शासन सर्वसामान्य नागरिकांप्रती कायम संवेदनशील आहे. त्यामुळेच २३ वर्षांपासून प्रलंबित राहिलेला प्रश्न तडीस नेऊन सेवाशुल्काच्या रकमेवरील व्याज पूर्णतः माफ केले आहे. या पार्श्वभूमीवर सेवाशुल्क अदायगीकरिता ई-बिलिंग संगणकीय प्रणालीची सुरूवात म्हणजे म्हाडासाठी एक 
ऐतिहासिक निर्णय आहे. कारण मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील ५६ वसाहतींमधील सुमारे १ लाख ४६ हजार  गाळेधारकांना याचा फायदा होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
 
गृहनिर्माण मंत्री आव्हाड पुढे म्हणाले की, शासनाच्या निर्णयानंतर मुंबई मंडळातर्फे सेवा शुल्काच्या वसुलीकरिता एप्रिल -२०२१ पासून अभय योजना राबविण्यात आली आहे.  या योजनेअंतर्गत शासनाने सन १९९८ ते २०२१ पर्यंतचे संपूर्ण व्याज माफ करुन या काळातील मुद्दल पाच वर्षांत दहा हफ्त्यांमध्ये  भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. तसेच एकरकमी सेवाशुल्क भरू इच्छिणाऱ्या गाळेधारकांना विशेष सवलत देखील देण्यात आली आहे. अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. आव्हाड यांनी या प्रसंगी केले. मंडळाने तयार केलेल्या ई – बिलिंग प्रणालीमुळे गाळेधारकांना स्पर्शविरहित पेमेंटचा पर्याय उपलब्ध झाला आहे. लवकरच गाळेधारकांना सेवाशुल्काचे देयक त्यांच्या ई-मेल वर प्राप्त होणार आहे व देयकाबाबत एसएमएस वर संदेश देखील प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर गाळेधारकांच्या सेवाशुल्क देयकाविषयी कोणत्याही  तक्रारींकरिता ई – बिलिंगच्या संकेतस्थळावर मिळकत व्यवस्थापन निहाय मेलबॉक्स देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी या प्रसंगी दिली.
 
मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, ई-बिलिंग प्रणालीचा वापर करण्याकरीता गाळेधारकांना म्हाडाच्या https://mb.mhada.gov.in/billing या संकेतस्थळावर तसेच https://mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर सिटीझन कॉर्नर या विंडोअंतर्गत ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
नवीन ई-बिलींग प्रणाली बाबत..
 
ई-बिलिंग प्रणालीचा वापर करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करावा.
१) म्हाडाच्या https://mb.mhada.gov.in/billing या संकेतस्थळावर जावे. तसेच म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर देखील सिटीझन  कॉर्नर या विंडोअंतर्गत ही सेवा उपलब्ध आहे.
२) संकेतस्थळावर लॉग इन केल्यानंतर म्हाडाचे बोधचिन्ह असलेले पान उघडेल. ही सेवा वापरण्यासाठी मंडळाकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर प्रत्येकासाठी एक युनिक कन्झ्युमर क्रमांक (Unique Consumer Number) तयार करण्यात आला आहे. हा युनिक कन्झ्युमर क्रमांक वापरुन संकेतस्थळावर लॉग इन करावे.
३) कन्झ्युमर क्रमांक टाकल्यानंतर पेमेंट करण्यासाठीचे पृष्ठ उघडेल. या पृष्ठाच्या उजव्या बाजूला वर तुमचे देयक डाऊनलोड करण्यासाठीची लिंक दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करताच देयक पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड होईल. त्यावर तुमच्या देयकाची संपूर्ण माहिती दिलेली असेल. त्यामध्ये मागील देयक, थकबाकी यांसारख्या सर्व गोष्टी उपलब्ध होतील.
४) देयक अदा करणाऱ्याचे नाव, देयकाची रक्कम, मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी टाकला की ‘पे’ या बटनावर क्लिक करावे. त्यावर क्लिक करताच पेमेंट गेटवे ओपन होईल.
५) या सुविधेअंतर्गत डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बॅंकींग, युपीआय तसेच अगदी गुगल पे वापरुन सुद्धा गाळेधारकांना देयक अदा करता येणार आहे.  गाळेधारकांना हव्या त्या पध्दतीने हे पेमेंट करण्याची मुभा आहे.
६) देयकाची रक्कम खात्यातून वळती झाल्यानंतर गाळे धारकांना लगेचच त्याची पोच मिळेल. प्रत्येक गाळेधारकाला आपल्या खात्याची संपूर्ण माहिती येथे कायम उपलब्ध राहणार आहे.