सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 (21:07 IST)

ईडी चौकशीचा तणाव : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यास हृदयविकाराचा झटका

कोल्हापूर जिल्हा बँकेतील कर्मचारी सुनील लाड यांना हृदयविकाराचा झटका आला आहे .ईडीकडून काल 30 तास चौकशी सुरू असताना लाड बँकेत कार्यरत होते.आज सकाळी कर्मचाऱ्यांनी एक तास काम बंद आंदोलन करून निषेध केला होता. दरम्यान आज सुनील लाड यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ईडीकडून गुरुवारी चौकशी सुरू असताना लाड बँकेत होते. 30 तास ईडीकडून चौकशी सुरू होते. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी तणावाखाली आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीला काही झाल्यास सर्वस्वी ईडी जबाबदार असेल, असा इशारा कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
 
30 तासांपासून बँकेमध्ये ईडीची कारवाई सुरु आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण होते. गुरुवारी सकाळपासून आपापले विभाग सोडायचे नाहीत, असे आदेश दिल्याने कर्मचारी अस्वस्थ होते. कर्मचाऱ्यांना बँकेतून खाली पाठवून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचे समजताच कर्मचारी आक्रमक झाले होते.
 
दरम्यान, कोल्‍हापूर जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेवर ईडीने घातलेल्‍या छाप्‍याचा निषेध करण्‍यासाठी शुक्रवारी (दि.3) जिल्‍हा बँकेच्‍या प्रधान कार्यालयासह जिल्‍ह्यातील सर्व शाखांमध्‍ये सकाळी एक तास आंदोलन करण्‍यात आले. या निमित्ताने जिल्‍हा बँकेच्‍या मुख्‍य कार्यालयासमोर बँकेतील दोन्‍ही युनियनच्‍या वतीने द्वारसभा घेण्‍यात आली. यावेळी आर. बी. पाटील, दिलीप लोखंडे, दिलीप पवार आदी उपस्‍थित होते. यावेळी देण्‍यात आलेल्‍या घोषणांमुळे बँकेचा परिसर दणाणून गेला.

Edited By-Ratnadeep Ranshoor