शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 (09:50 IST)

विधान परिषद निवडणूक : नागपूर, अमरावतीत भाजपला धक्का, नाशिकमध्ये सत्यजित तांबे विजयी

satyajit tambe
facebook
महाराष्ट्रात झालेल्या विधान परिषद निवडणूक निकालांचं पूर्ण चित्र गुरुवारी रात्री उशीरा हाती आलं. एकूणच, यंदाच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला असून त्यांना केवळ कोकण मतदारसंघातील विजयावरच समाधान मानावं लागलं आहे.
 
अमरावती पदवीधर मतदारसंघाचे निकाल गुरुवारी रात्री उशीरा समोर आले. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी भाजपच्या डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केल्याचं स्पष्ट झालं.
 
कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. म्हात्रे जरी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढले असले तरी ही जागा शिंदे गटाची होती हे लक्षात घ्यायला पाहिजे.
 
बदलापुरातल्या म्हात्रे यांचं कुटुंब पारंपारिकरित्या शिवसेनेशी संबंधित आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतर ते शिंदे गटाच्या बाजूने गेलं. त्यानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भाजपकडून तिकिट मिळवलं. म्हणजे एकप्रकारे इथं भाजपला उमेदवार आयात करावा लागलाय.
 
नागपुरात भाजपचा पराभव
नागपूरच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसनं भाजपला धोबीपछाड दिली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार नागो गाणार यांचा काँग्रेस उमेदवार सुधाकर अडबाले यांनी पराभव केला आहे. गाणार गेले 12 वर्षं इथं आमदार होते.
 
इथं अडबाले यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि स्थानिक नेतृत्वात वाद होता. विजय वडेट्टीवार आणि इतर नेते अडबालेंसाठी आग्रही होते. त्यांनी त्यांची भूमिका कायम ठेवल्यामुळे नाना पटोलेंना इथं माघार घ्यावी लागली होती.
 
विक्रम काळे विजयी
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे विक्रम काळे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार किरण काळे यांचा पराभव केला आहे.
 
नाशिकमधून सत्यजित तांबे विजयी
नाशिकच्या लढतीकडे सर्वांच लक्ष होतं. तिथं अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय झाला आहे.
 
काँग्रेसने सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृतपणे उमेदवारी दिली होती, पण ऐनवेळी त्यांच्याऐवजी सत्यजित तांबे यांनी अर्ज दाखल केला.
 
त्यानंतर काँग्रेसनं सुधीर तांबे यांचं पक्षातून निलंबन केलं. सत्यजित तांबेंवरही कारवाई करण्यात आली.
 
नाशिकमध्ये भाजपनं त्यांचा उमेदवार दिला नव्हता. तसंच भाजपने अधिकृतपणे कुणाला पाठिंबादेखील जाहीर केलेला नव्हता. पण भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र सत्यजित तांबेंना भाजपचे लोक मतदान करतील, असं म्हटलं होतं.
Published By -Smita Joshi