सोमवार, 11 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 एप्रिल 2022 (07:34 IST)

ईडीचा देशमुखांच्या जामिनाला विरोध, सांगितले जामीन मिळाल्यास पुराव्यांशी छेडछाड करतील

anil deshmukh
मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेच या प्रकरणातील मास्टरमाईंड आहेत असं म्हणत ईडीने त्यांच्या जामिनाला जोरदार विरोध केला आहे. ईडीने उच्च न्यायालात प्रतिज्ञापत्र सादर केलं. यामध्ये ईडीने देशमुखांच्या जामिनाला विरोध करताना देशमुख यांना जामीन मिळाल्यास ते पुराव्यांशी छेडछाड करतील, असं म्हटलं.
 
अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्यापुढे सुनावणी होणार आहे. ईडीच्यावतीनं सहाय्यक संचालक तसिन सुलतान यांच्यावतीनं ईडीचे वकील श्रीराम शिरसाट यांनी उत्तरादाखल हे ५६ पानी प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख मास्टरमाईंड आहेत असं म्हटलं. तसंच, त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत बेहिशेबी मालमत्ता जमावली. याशिवाय, पोलीस दलातील अधिकार्‍यांच्या बदल्या आणि पोस्टिंग तसेच पोलीस अधिकार्‍यांच्या कामगिरीवर प्रभाव टाकल्याचं ईडीने नमूद केलं आहे.
 
अनिल देशमुख हे एक राजकारणातील प्रभावशाली व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांची सुटका झाल्यास ते साक्षीपुराव्यांशी छेडछाड करू शकतात, असं ईडीनं म्हटलं. तसंच देशमुख हे तपासात सहकार्य करत नसल्यानं त्यांना जामीन देऊ नये, असंही ईडीनं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.