गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 जुलै 2022 (23:22 IST)

एकनाथ शिंदेंनी बिंग फोडलं आणि फडणवीसांनी कपाळावर हात मारला

shinde fadnais
'हशा आणि टाळ्या' नावाचं प्र. के. अत्रे यांचं पुस्तक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या पहिल्याच भाषणात हशा आणि टाळ्या वसूल केलंच पण त्यांच्या दिलखुलास भाषणाने त्यांचे सहकारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर डोक्यावर हात मारण्याची वेळ आली.
 
एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी विधान परिषद निवडणुकीनंतर सुरत गाठलं. त्यानंतर ते गुवाहाटीला गेले. तिथून ते गोव्याला रवाना झाले. सरकार स्थापन झाल्यानंतरच ते मुंबईत परतले. या 11 दिवसात नेमकं काय झालं याविषयी नवनियुक्त मुख्यमंत्र्यांनी भाषणादरम्यान खुलासा केला.
 
देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री कशी भेट व्हायची हा किस्सा मुख्यमंत्र्यांनी कथन केला आणि फडणवीसांनी डोक्याला हात लावला.
 
"मी आणि फडणवीस कधी भेटायचो हे आमच्याही लोकांना माहिती नव्हते. सगळे झोपल्यावर मी फडणवीसांना भेटायला जायचो आणि सगळे उठायच्या अगोदर परत यायचो," एकनाथ शिंदे असं म्हणताच देवेंद्र फडणवीसांनी डोक्याला हात लावला आणि सगळं उघड करू नका अशी म्हणायची वेळ फडणवीसांवर आली.
 
"फडणवीसांनी एकच शपथविधी होईल असं सांगितलं होतं आणि सगळं माहिती असल्याने ते खूश होते. पण आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार घेतला आहे. त्यांचा आणि आमचा अजेंडा सारखाच आहे. त्यांचे 115 आणि आमचे 50 असे मिळून 165 झाले. अजितदादा तुम्ही मगाशी म्हणालात की आम्ही निवडून येणार नाही. पण जे पूर्वी गेले ते विरोधी पक्षात गेले, हिंदुत्वाचा विरोध केला त्यांच्याकडे गेले. आम्ही हिंदुत्वाचा पुरस्कार कऱणाऱ्यांकडे गेलो आहे. त्यामुळे 165 नाही, आम्ही दोघं मिळून 200 लोक निवडून आणणार," असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
 
भाषण करणं ही एक कला आहे. कसं बोलायचं, काय सांगायचं, काय नाही सांगायचं, कुठल्या शब्दांचा उपयोग करायचा, कुठे थांबायचं अशी सगळी कसरत असते. विधिमंडळातल्या भाषणाला औपचारिकतेची डूब असते. पण नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर पहिलंच भाषण खुसखुशीत तर होतंच पण या भाषणाने अनेक घटनांवरचा पडदा हटला.
 
मुख्यमंत्री शिंदेंच्या दिलखुलास बोलण्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुरुवातीला हसवलं, नंतर ते थोडे अस्वस्थ दिसले. नंतर तर त्यांच्यावर कपाळावर हात मारण्याची वेळ आली.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणादरम्यान याव्यतिरिक्त अनेक किस्से सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले," राज्यसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने 42 आकडा ठरवला पण घेतल्या 44. राष्ट्रवादीने 43 घेतले. एवढं झालंय तरी आपली जागा निवडून येऊ शकते. बघितलं- साला आमचा दुसरा माणूस पडला."
 
मुख्यमंत्र्यांकडून अससंदीय शब्दाचा प्रयोग झाल्यानंतर सभागृहात हास्यकल्लोळ झाला. त्यांनी तात्काळ तालिका अध्यक्षांकडे शब्द मागे घेतो असं सांगितलं. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील म्हणाले, "मुख्यमंत्री महोदय तुम्ही शब्द मागे घेऊ नका. ते नॅचरल फ्लोमध्ये आहे. ते तसंच सुरू राहू द्या. जे नैसर्गिक आहे ते आपण केलं पाहिजे, त्यात अडथळा यायला नको," असं जयंत पाटील म्हणताच पुन्हा सभागृहात हशा पिकला. तुमच्या शेजाऱ्यांचा परिणाम होऊ देऊ नका असा टोलाही पाटलांनी लगावला.

'मला मुख्यमंत्री करणार होते'
सुरुवातीला मला मुख्यमंत्री करणार होते. सर्व आमदारांना हे माहिती आहे. पण अजित पवार का इतर कोणी विरोध केला. आम्हाला सांगण्यात आलं की, ही जबाबदारी तुम्हालाच घ्यायची आहे. मी ठीक आहे म्हटलं. मी कधीही कोणत्याही पदाची लालसा केली नव्हती, कधी बोलणारही नाही. पण एकदा अजित पवार बोलता बोलता इथे पण अपघात झाला आहे असं बोलून गेले. मी बाजूला नेऊन विचारलं असता आमचा कोणाचा विरोध नाही, तुमच्या पक्षाचा निर्णय होता असं सांगितलं".
 
त्यानंतर मी सर्व विसरुन गेलो होतो. उद्धव ठाकरेंनी शरद पवारांनी सांगितल्याचं सांगण्यात आल्यानंतर मी एकाही शब्दाने बोललो नाही. पदाच्या लालसेपोटी आम्ही गेलो नाही. अन्यथा इतके मंत्री सत्तेच्या बाहेर आले नसते," असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
 
"निवडून आलेल्या आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. पुढची निवडणूक जिंकू की नाही असा प्रश्न त्यांना सतावत होता. भाजपाशी आपली नैसर्गिक युती असल्याचं ते सांगत मला उद्धव ठाकरेंशी बोला म्हणत होते. मी पाच वेळा प्रयत्न केला, केसरकार साक्षीदार आहे. आम्हाला त्यात यश मिळालं नाही," असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
 
तर जगाचा निरोप घेऊन कायमचा निघून जाईन
मुख्यमंत्री म्हणाले, "एखादा आमदार असो वा खासदार, तो नेहमी विरोधी पक्षाकडून सत्तेकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण आम्ही सत्तेत असताना विचारांसाठी हे पाऊल उचललं. माझ्यासोबत आलेले अनेकजण मंत्री होते, स्वत:चं मंत्रीपद धोक्यात घालून ते माझ्यासोबत आले."
 
पण बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं होतं की, अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी आपण बंड, उठाव केला पाहिजे. त्यानंतर मला काय झालं माहीत नाही, माझे धडाधडा फोन सुरू झाले. माझ्या फोननंतर सर्वजण येऊ लागले. कुठे चाललोय, कशासाठी चाललोय, कुणी काहीही विचारलं नाही. मुख्यमंत्र्यांचे मला फोन आले. कुठे चालला आहात? त्यांनी विचारलं. मला माहीत नाही, कधी येणार तेही माहीत नाही, अशी उत्तरं त्यांना दिली. एकाही आमदारानं म्हटलं नाही, की मुख्यमंत्र्यांना भेटून पुढे जाऊ. कारण हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. हा त्यांचा विश्वास आहे. हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नाही," असंही ते म्हणाले.
 
माझं खच्चीकरण कसं झालं? हे सुनील प्रभूंना देखील माहीत आहे. शेवटी हा एक शिवसैनिक आहे, काही व्हायचं ते होऊ दे, लढून शहीद झालो तरी चालेल पण आता माघार नाही. शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल, एकटा शहीद होईल पण बाकी सारे वाचतील. मी माझ्या आमदारांना सांगितलं होतं, तुम्ही काहीही चिंता करू नका. तुमचं नुकसान होतंय, असं मला जेव्हा वाटेल त्यादिवशी मी तुम्हाला सांगेन. तुमचं भवितव्य सुरक्षित करेन आणि जगाचा कायमचा निरोप घेऊन निघून जाईन, हे मी माझ्या आमदारांना सांगितलं होतं," असंही मुख्यमंत्री म्हणाले.
 
'तर तुम्हाला पकडता आलं असतं'
तुमच्याकडे टॉवर लोकेशन आहे. पटापट आम्हाला पकडता आलं असतं. आयजींना नाकाबंदी करा सांगण्यात आलं. पण मीही अनेक दिवस काम करतो आहे. नाकाबंदीतून वाट काढून कसं जायचं हे मला माहिती आहे.
 
तुम्ही माझ्याकडून सगळं काढून घेणार का? असं मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उद्देशून म्हणताच सभागृहात हशा पिकला. ते खाजगीमध्ये सांगेन. नाहीतर तुम्हीपण तसंच कराल असं मुख्यमंत्री म्हणताच अख्खं सभागृह हास्यकल्लोळात दंग झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगीही डोक्याला हात लावून या किश्श्याची मजा लुटली.