गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 जुलै 2022 (11:54 IST)

एकनाथ शिंदे म्हणतात, ‘उद्धव ठाकरे म्हणाले परत या, पण...’

eknath shinde
प्राजक्ता पोळ
एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि विश्वासमतही जिंकलं आहे. बीबीसी मराठीसाठी प्राजक्ता पोळ यांनी शिंदे यांच्याशी संवाद साधला. त्या मुलाखतीचा हा संपादित अंश.
 
जेव्हा तुम्हाला कळलं की तुम्ही मुख्यमंत्री होणार आहात तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती?
 
आज जवळपास 50 आमदारांनी असा निर्णय घेणे ही राज्यभरातलीच नव्हे तर देशभरातील मोठी घटना आहे. विरोधी पक्षातील नेते सरकारमध्ये येण्यास उत्सुक असतात. पण इथे सरकारमधलेच नेते पायउतार होत आहेत. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा अजेंडा आम्ही घेतला. अन्यायाविरुद्ध उठाव करावा असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तोच उठाव आम्ही केला. मुख्यमंत्रिपदाची लालसा ठेवून मी हा निर्णय घेतला नाही. कारण सुरुवातीलाच उद्धव ठाकरे साहेबांनी मला सांगितलं की मी तुम्हाला संधी देतो, पण तसं झालं नाही. पण त्यानेही मी निराश झालो नाही.
 
भाजपाकडे आमच्यापेक्षा जास्त आमदार होते तरी त्यांनी हे पद आम्हाला दिलं याबद्दल मी भाजपा नेत्यांचा आभारी आहे.
 
उद्धव ठाकरे सरकारमधून बाहेर पडावं असा विचार तुमच्या मनात कधी आला?
 
महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर काही दिवसात हा सगळा प्रकार सुरू झाला. हा निर्णय मी माझं खच्चीकरण झालं म्हणून घेतलेला नाही. 25-30 आमदारांना रोजच्या रोज जे अनुभव येत होते त्यावरून मी हा निर्णय घेतला. कारण निवडणुकीत जे उमेदवार पडले त्यांना इतर घटकपक्ष ताकद देऊ लागले आणि आमच्या शिवसैनिकांचं खच्चीकरण करू लागले, शिवसैनिकांवर खोट्या केसेस करू लागले. त्यामुळे शिवसेनेला काय मिळालं, शिवसेनेला या सत्तेचा काय फायदा झाला?
 
या घडामोडींचा अनेकदा विचार केला, त्याची माहिती प्रमुखांना दिली. नगरपालिका निवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकावर गेली. अशा परिस्थितीत आमदारांनी मला सांगितलं की आता तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. तुम्ही नाही घेतला तर आम्ही काहीतरी वेडा वाकडा निर्णय घेऊ.
 
त्यामुळे हा एक दिवसात झालेला प्रकार नाही. ही गोष्ट आम्ही वारंवार सांगितली. दुर्दैवाने आम्हाला त्यात यश आलं नाही म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.
 
तुम्ही म्हणता की तुम्ही शिवसेनेत आहात, उद्धव ठाकरे म्हणताहेत की ते शिवसेनाप्रमुख आहे. तुमच्या शिवसेनेचे प्रमुख कोण आहेत?
 
असं आमचं काहीच म्हणणं नाही. लोकशाहीत बहुमताला मान असतो. ते आमच्याकडे आहे.
 
धनुष्यबाण चिन्हासाठी तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहात का?
 
कालच आम्ही बहुमत सिद्ध केलं आहे. आता आम्ही आमच्या आमदारांशी चर्चा करू आणि मग पुढे जाऊ.
 
तुमच्या बंडाची उद्धव ठाकरेंना कल्पना होती का? त्यांनी सांगितलं की कुणकूण लागली होती, नाकाबंदी लागली होती असंही तुम्ही म्हटलंय.
 
मी सांगितलं होतं त्यांना. मी त्यांना म्हटलं मी चाललो, तेव्हा ते म्हणाले की परत या. मी त्यांना सांगितलं की मला माहिती नाही की मी परत येईन की नाही. तेव्हाच त्यांनी योग्य पावलं उचलली असती तर आज ही वेळ आली नसती.
 
उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकत्र लढवण्याची तयारी दाखवली तर तुम्ही जाल का?
 
ज्या पद्धतीने ते आमच्यावर आरोप करताहेत, आमच्यावर टीका करताहेत, आम्हाला गटनेते पदावरून काढून टाकलंय, आमचे पुतळे जाळताहेत. मला नाही वाटत त्यांच्याकडून काही अपेक्षा आहेत.
 
या सरकारचा रिमोट कंट्रोल कोणाकडे असेल? तुमच्याकडे की देवेंद्र फडणवीसांकडे?
 
मी आणि देवेंद्र फडणवीस अतिशय चांगले मित्र आहोत. आमच्या दोघांचा पर्सनल अजेंडा काहीच नाही. या राज्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा आहे.