मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 नोव्हेंबर 2022 (08:11 IST)

राज्यातील ७ हजार ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

Election 2022
शिवसेनेमध्ये मोठी फूट पडल्यानंतर राज्यात पहिल्यांदाच तब्बल ७ हजार ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने त्याची घोषणा केली आहे. यानिमित्ताने ग्रामीण भागातील राजकारण ढवळून निघणार आहे.
 
राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
 
श्री. मदान यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.
 
विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या: अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor