शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (21:22 IST)

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना भावनिक साद

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना भावनिक साद घातली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात बाहेरचे नाहीत. मात्र सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
 
“राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे”
एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
 
अशा परिस्थितीत , कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. अशी हात जोडून विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
 
”शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा”
आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे. असही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
 
“संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका”
राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या. असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.