अलमट्टी धरणांचेही प्राधिकरण स्थापन करा
कावेरी प्राधिकरणाच्या धर्तीवर कोयना व अलमट्टी धरणांचेही प्राधिकरण स्थापन करण्यात यावे. त्यात राजकीय हस्तक्षेप न करता फक्त तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश करावा. याबाबत सरकारने पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात दोन्ही धरणांतील पाणी सोडण्याच्या प्रश्नी योग्य नियोजन केले जाऊ शकेल आणि अशा प्रकारच्या पुराच्या संकटाचा सामना करता येईल, अशी सूचना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला केली आहे.
अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे सांगली, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात पुराची आपत्ती आली आहे. त्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. याकडे शासकीय यंत्रणेकडून मदत करण्याबाबत सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाले. अशी पूर परिस्थिती जर विदर्भात निर्माण झाली असती तर सरकार असे वागले असते का? असा सवाल चव्हाण यांनी केला.