शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 जानेवारी 2021 (07:47 IST)

ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवानंतरही बॅनरबाजी, सोशल मिडीयासह सर्वत्र जोरदार चर्चा

लातूरच्या एका तरुण उमेदवाराने ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवानंतरही बॅनर लावल्यामुळे त्यांची राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. लातूर तालुक्यातील जळकोट येथील कोनळी डोंगरी ग्रामपंचायतीच्या विकास शिंदे कोनाळीकर या तरुणाने निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर चक्क मतदारांचे आभार मानणारे बॅनर लावले आहेत. विशेष म्हणजे अवघी १२ मतं पडूनही त्याने बॅनरबाजी केली आहे.
 
‘वाटलं होतं गड्या आपला गाव बरा…पण तुम्ही म्हणालो पसारा भरा. आम्ही जातो आमच्या गावा… आमचा राम राम घ्यावा. समाजन धिक्कारलं… गावानं नाकारलं… पण आम्हाला देश स्वीकारणार…! आमच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या… बारा मतदारांचे जाहीर आभार…! ना जातीसाठी… ना धर्मासाठी… आमचा लढा मातीसाठी… जगेन तर देशासाठी… मरेन तर देशासाठी. मला ज्यांनी बारा मते देऊ संघर्ष करण्याचे ताकद दिली त्यांचे सात जन्मही उपकार फिटणार नाही. तुमच्या मताचे देशात नाव करीन. खंडेराया नगरीचे पराभूत उमेदवार विकास शिंदे कोनाळीकर’ अशा आशयाचं हे बॅनर आहे.
 
विकास शिंदे कोनाळीकार याचं अहमदपूर इथं पॉलिटेक्निकचं शिक्षण सुरू असून पुण्यात तो काही काळासाठी राहत होता. त्यानंतर गावाचा विकास करण्यासाठी त्याने ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचे ठरवले. निवडणुकीत त्याला अवघी बारा मतंच मिळाली. पण पराभवानंतरही मतदान करणाऱ्या १२ मतदारांचे आभार मानल्यामुळे तो सोशल मीडियावर हिरो ठरतोय.