बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 मे 2022 (22:00 IST)

अतिरिक्त ऊसाचा बीड जिल्ह्यात पहिला बळी

suicide
संतप्त शेतकऱ्याने ऊस पेटवून देत ऊसाच्या फडातील झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या
बीड जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा (Sugarcane)प्रश्न पेटला असून जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा पहिला बळी गेला आहे. तोडणीला आलेला ऊस कारखाना घेऊन जात नसल्याने 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याने (Farmer)चक्क ऊस पेटवून देत झाडाला गळफास (suicide)घेऊन आत्महत्या केलीय. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना बीडच्या (Beed)गेवराई तालुक्यातील हिंगणगावमध्ये घडली आहे.
 
नामदेव आसाराम जाधव (रा. हिंगणगाव ता. गेवराई जि. बीड) यांची एकूण 2 एकर शेती असून त्यांनी शेतामध्ये 265 जातीचा ऊस लागवड केला होता. त्यासाठी त्यांना एक लाख ते सव्वा लाख रुपये खर्च आला होता. मात्र हा ऊस आता तोडणीला येऊन देखील परिसरातील एकही कारखाना तो ऊस घेऊन जात नव्हता. गेल्या अनेक दिवसांपासून ऊस घेऊन जाण्यासाठी नामदेव जाधव हे कारखान्याकडे चकरा मारत होतो. मात्र त्यांना कारखान्याकडून निराशाच मिळाली. यामुळे नैराश्यात आलेल्या आसाराम जाधव यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यांनी ऊसाच्या फडाला पेटवून देत झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.
 
दरम्यान बीड जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर बनला असून जवळपास 30 ते 40 हजार मेट्रिक टन ऊस अद्यापही बीड जिल्हा शिल्लक असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे एकीकडे अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला असताना देखील कारखानदार मात्र मनमानीपणा करत आहेत. परजिल्ह्यातील ऊस आयात करत आहेत. यामुळे तळहाताच्या फोडा सारखा जपलेला ऊस कुठे घालावा ? असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढं उभा ठाकलाय. त्यामुळे आता संतप्त आणि हतास झालेल्या शेतकऱ्यांकडून, टोकाचं पाऊल उचलला जात असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात निर्माण झालय. त्यामुळे आता साखर आयुक्त आणि सरकारने यावर तात्काळ तोडगा काढावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.