शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 सप्टेंबर 2022 (15:51 IST)

लेसर शो मुळे कोल्हापूर शहरात ६३ जणांच्या डोळय़ाला इजा

कोल्हापूर शहरात ६३ जणांच्या डोळय़ाला इजा पोहोचली आहे. या ‘लेसर शो’साठी परवानगी दिली जाऊ नये अशी सूचना असतानाही त्याकडे प्रशासनाने डोळेझाक केल्याचा हा परिणाम असल्याचा सूर आहे.
 
यावर्षी गणेशोत्सव निर्बंधमुक्त करण्यात आला होता. विसर्जन मिरवणुकीत वाद्याच्या भिंतींचा दणदणाट सुरू होता. दुसरीकडे काही मंडळांनी मिरवणूक आकर्षक बनण्यासाठी अति तीव्र ‘लेसर’ किरणांचा वापर केला होता. या अति तीव्र किरणांमुळे ६३ जणांच्या डोळय़ाला इजा पोहोचली आहे. यामध्ये आबालवृद्धांचा समावेश आहे.
‘लेसर’ किरणांची क्षमता दहा वॅटपेक्षा अधिक असू नये, एकाच ठिकाणी ‘लेसर’ केंद्रित करू नये, डोळे तसेच नाजूक त्वचा यास इजा पोहोचू नये अशा प्रकारे लेसर किरणांचा वापर करण्याच्या कंपन्यांच्या सूचना आहेत. हा आरोग्यसाठीच्या खबरदारीचा नियम आहे. मात्र त्याकडे सार्वजनिक मंडळांनी पाठ फिरवली. तर प्रशासनानेही डोळेझाक केली.
 
२०१८ सालच्या विसर्जन मिरवणुकीत राजारामपुरी भागात काही मंडळांनी लेसर शोचे आयोजन केले होते. त्याही वेळी अनेकांना डोळय़ाला इजा पोहचली होती. यावर्षी देखील गणरायाचे आगमन मिरवणुकीवेळी लेसर शोमध्ये डोळय़ांना इजा, मोबाईल खराब होणे असे प्रकार घडले होते. त्यानंतर विसर्जन मिरवणुकीवेळी लेसर शोला परवानगी दिली जाऊ नये, अशा सूचना अनेकांनी पोलीस, प्रशासनाकडे केल्या होत्या. मात्र याबाबत पुरेशी दक्षता घेतली गेल्याचे दिसत नाही. दरम्यान, वाद्याच्या िभती आणि ‘लेसर शो’ मुळे इजा पोहोचलेल्या मंडळावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.