पक्षात दोन गट पडणे, संघर्ष होणे हे महाराष्ट्राला नवीन नाही पण संघर्षालाही मर्यादा असावी; शरद पवार
पक्षात दोन गट पडणे, संघर्ष होणे हे महाराष्ट्राला नवीन नाही. पण संघर्षालाही मर्यादा ठेवली पाहिजे. सध्या राज्यात दसरा मेळाव्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात जे राजकारण सुरू आहे ते दुर्देवी आहे. दसरा मेळाव्यात त्यांनी एकमेकांवर टीका करताना मर्यादा ओलांडू नये, ते राज्याच्या दृष्टीने चांगले होणार आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन्ही गटाचे कान टोचले.
पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले, शिंदे व ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. एका पक्षाचे दोन भाग झाले आणि खरा पक्ष कोणता यावरुन त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली आहे. या स्पर्धेच्या निकालाची सूत्रे एकप्रकारे दसरा मेळाव्याच्या माध्यमातून स्वीकारली गेली आहेत. संघर्षालाही मर्यादा असतात. दोन्ही गटाने या मर्यादा पाळाव्यात. सध्या दसरा मेळाव्यावरुन राज्यात सुरू असलेलं राजकारण दुर्देवी आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor