शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (21:51 IST)

वीज बीलावरून फडणवीस यांची सरकारवर टीका

वीजबिल थकबाकीची वेळेवर वसुली झाली नाही तर संपूर्ण राज्य अंधारात जाऊ शकतं, अशी चिंता राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. थकबाकीची वसुली करण्यासाठी सरकारकडून बाऊ केला जातोय अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. वीजबिल वसुली करण्यासाठी सरकारचा हा डाव आहे, असं देखील फडणवीस म्हणाले. नागपूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. यात थकीत वीजबिलांसंदर्भात राऊत यांनी माहिती दिली. यावरुन देवेंद्र पडणवीस यांनी टीका केली आहे. “त्यांनी जे सादरीकरण केलं त्यामध्येच लक्षात येतं की त्यांच्या काळात किती थकबाकी वाढली. ही थकबाकी आपण दाखवतोय, यामध्ये विशेषत: कृषी पंपांच्या संदर्भात क्रॉस सबसीडी करतो. त्यानंतर जे काही आपलं नुकसान आहे, ते नुकसान भरुन काढण्याकरिता आपल्याला जो जकात मिळतो, त्यातुन नुकसान भरुन काढतो. त्यामुळे या ठिकाणी जबरदस्तीने वसुली करण्याकरिता हा बाऊ केला जात आहे. एकीकडे कोरोनामुळे शेतकरी, सामान्य माणूस अडचणीत आहे. तो अडचणीत असताना त्याला मदत करण्याऐवजी जबरदस्तीने वसुली या सरकारला करायची आहे. सावकारासारखी वसुली या सरकारला करायची आहे. त्यामुळे हे सगळं नाटक सुरु आहे,” अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली.