शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (14:16 IST)

दशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबाची बोट उलटून 11 जण बुडाले

वर्धा- वर्धा जिल्ह्यात घडलेल्या एका दुर्घटनेत वर्धा नदीत बोट उलटली आहे. या दुर्घटनेत 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेनंतर अद्याप ३ मृतदेह मिळाले आहेत. 
 
बेनोडा पोलीस स्टेशन अंतर्गत वरूड तालुक्यातील झुंज गावाजवळ ही घटना घडली आहे. बोट नेमकी कशी बुडाली याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.
 
प्राथमिक माहितीनुसार, एकाच कुटुंबातील ११ जण गाडेगाव येथील मटरे कुटुंबीयांकडे दशक्रियेच्या विधीसाठी आले होते. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास वरुडकडे फिरायला गेले असताना कुटुंब महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून नावेने जात होते. मात्र, अचानक नाव उलटली आणि अकराही जण बुडाले. वर्धा जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्या ओसंडून वाहत आहेत. नदीच्या एका किनाऱ्यावरुन दुसऱ्या किनाऱ्यावर जात असताना बोटीला अपघात झाला आहे. या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसल्याने ही दुर्घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
 
या बोटीतून जवळपास 20 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. बोट नदीच्या मधोमध आली असताना अचानक बोट बुडाली. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत काही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अद्याप आठ जणांचा शोध सुरू आहे.
 
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थानी गर्दी केली असून शोध मोहिम आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे.