शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 डिसेंबर 2022 (15:40 IST)

अपघाताच्या निमित्ताने नाशकात सापडल्या कोट्यवधींच्या बनावट नोटा

नाशिकमध्ये खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. शहरात तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अंबड पोलिसांनी धाव घेतली. अपघातातील एका वाहनात असे काही आढळले की ज्यामुळे नाशकात एकच खळबळ उडाली आहे. हा कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता व त्याच्या गाडीत कोटीवधींनी भरलेली बॅग होती. मात्र यात खळबळजनक म्हणजे ही कोटीवधींनी भरलेली बॅग बनावट नोटांची होती. यामुळे पोलिसही थक्क झाले आहेत. शहरात आधी इडलीवाल्याकडे नकली नोटा आढळल्या आणि आता या इसमाकडे, त्यामुळे नाशिक शहर नकली नोटांचे केंद्र बनते की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (दि. २९) उंटवाडी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वाहनांचा अपघात  झाला होता. या अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सुदैवाने या अपघातात लोक किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
 
पोलिसांनी घटनास्थळी जात घटनेची पाहणी केली. तसेच तीनही अपघाग्रस्त वाहनांची कसून तपासणी केली. यामध्ये एक कारचालक हा मध्यधुंद अवस्थेत आढळला. या कारमध्ये मागच्या बाजूला एक बँगही आढळली. पोलिसांनी ही बँग उघडताच, त्यामध्ये कोट्यावधी रुपये असल्याचे लक्षात आले.
 
पहा बनावट नोटांचा व्हिडीओ
 
पोलिसांनी तत्काळ कारचालकासह कार पोलीस ठाण्यात आणली. पोलिसांनी बँगमधील नोटांची तपासणी केली असता, त्या नोटा नकली असल्याचे समोर आले आहे. त्यात 500 आणि 2000 च्या नकली नोटा सापडल्या आहे.
 
दरम्यान, ही रोकड कुठून आली कुणाची आहे. याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. मद्यधुंद कारचालक हा पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.
 
काही दिवसांपूर्वी आढळल्या होत्या बनावट नोटा
 
काही दिवसांपूर्वी एका इडलीवाल्याकडे बनावट नोटा आढळल्या होत्या. त्याच्याकडून ५ लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली होती. ही घटना ऑक्टोबर महिन्यात घडली होती. आणि आता पुन्हा अशी घटना घडल्याने ज्या नाशिकमध्ये नोटा छपाईचा कारखाना आहे, त्याच नाशिक शहरात बनावट नोटांचे केंद्र बनते की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
 
Edited by Ratnadeep Ranshoor