1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 26 जून 2021 (08:05 IST)

मुंबईनंतर ठाण्यातही बनावट लसीकरण

मुंबईत बनावट लसीकरण प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी ठाण्यातही एका विमा कंपनीतील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे बनावट लसीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या टोळीने ११६ जणांना बनावट लस टोचून १ लाख १६ हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे. त्यातील ४ जणांना बनावट प्रमाणपत्रेही देण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
 
मुंबईत बनावट लसीकरणाचे प्रकरण समोर आल्यानंतर यामध्ये अटकेत असलेल्या आरोपींनी ठाण्यातही हा कारनामा केल्याचे चौकशीत समोर आले होते. त्यानंतर नौपाडा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी महेंद्र सिंग आणि त्याचे साथीदार श्रीकांत माने, संजय गुप्ता, सिमा अहुजा व करीम या टोळीने २६ मे २०२१ जी लसीकरण केल्याची माहिती मिळाली. श्री जी आर्केडमधील रेन्यूबाय या कंपनीसाठी लसीकरण करण्यात आले होते.
 
कंपनीचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित या शिबिरात आरोपींनी भेसळयुक्त आणि बनावट डोस देत ते कोव्हिशिल्डचे डोस असल्याचं सांगितलं. यासाठी प्रत्येक लसीमागे एक हजार रुपये उकळण्यात आले. एकूण ११६ जणांच्या लसीकरणासाठी १ लाख १६ हजार रुपये वसुल करण्यात आले.
 
नौपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बनावट लस देऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केला. तसेच फसवणूक केल्याबद्दल कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर ५ जणांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतही बनावट लसीकरण प्रकरणी या सर्वांवर गुन्हे दाखल असून हे ५ आरोपी अटकेत आहेत. या आरोपींचा ताबा मुंबई पोलिसांकडून घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.