Mumabi Vaccination Scam, सोसायटीतील ३९० जणांना बोगस लस दिल्या
मुंबईतील एका हाऊसिंग सोसायटीत बोगस पद्धतीने लसीकरण सुरू असल्याचा दावा सोसायटीतील नागरिकांनी केला आहे. लसीकरण शिबीर आयोजित करून सोसायटीतील ३९० जणांना लस देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या आरोपानं खळबळ उडाली आहे. लस घेतल्यानंतर कुणालाही मेसेज आला नाही तर ज्या रुग्णालयांच्या नावे प्रमाणपत्र दिले गेले त्या रुग्णालयांनी आपण लसीकरण शिबीर घेतलं नसल्याचा खुलासा केला आहे. यामुळे लस घेतलेले नागरिक हादरले आहेत.
लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून मुंबईतल्या कांदिवली येथे असलेल्या हिरानंदानी इस्टेट या सोसायटीत राहणाऱ्या 390 जणांना 30 मे रोजी कोव्हिशिल्ड ही लस देण्यात आली. राजेश पांडे असं शिबिराची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तीचं नाव असून, त्याने स्वतःला कोकीलाबेन अंबानी हॉस्पिटलचा प्रतिनिधी असल्याचं सोसायटीतील नागरिकांनी सांगितलं. संजय गुप्ता यांनी हे लसीकरण शिबीर घेतल आणि महेंद्र सिंग यांनी सोसायटीतल्या सदस्यांकडून लसींचे पैसे घेतले अशी माहिती आरोप करणाऱ्यांनी दिली आहे.
याच शिबिरात लस घेतलेले हितेश पटेल म्हणाले, एका डोससाठी आमच्याकडून 1260 रूपये घेण्यात आले. माझ्या मुलाने लस घेतली पण, लस घेतल्यानंतर आम्हाला कोणताही मेसेज आला नाही. इतकंच नाही, तर आम्हाला लस घेताना फोटो सुद्धा काढू दिले नाही. 1260 रूपये एका डोससाठी या प्रमाणे सोसायटीतल्या 390 जणांनी लसीकरण शिबीर आयोजित करणाऱ्याला पाच लाख रूपय दिले.
लस घेतल्यानंतर एकालाही कोणतेही साईड इफेक्ट दिसून आले नाहीत. त्यामुळे आम्हाला धक्काच बसला. आम्हाला लस घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचं प्रमाणपत्रही दिलं गेलं नाही. त्यामुळे आम्ही हा नेमका काय प्रकार घडला आहे याचा शोध घेण्यास सुरूवात केली. 10-15 दिवसानंतर आम्हाला प्रमाणपत्र दिली गेली, मात्र असं कोणतंही शिबीर रूग्णालयातर्फे आयोजित करण्यात आलं नव्हतं असं रूग्णालयाने स्पष्ट केल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून आम्हाला बनावट लस दिले गेले असा आरोप आता रहिवाशांनी केला आहे. या प्रकरणात सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात असल्याचं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. संबंधित रुग्णालयातील अधिकारी आणि सोसायटीतील नागरिक यांची चौकशी केली जाईल. जर यात काही गैरकारभार झाला असेल, तर कारवाई केली जाईल, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.
लसीकरण शिबीर कोकीलाबेन अंबानी हॉस्पिटलचं नाव सांगून घेण्यात आलं मात्र, सोसायटीतील लसीकरण झालेल्या रहिवाशांना देण्यात आलेली प्रमाणपत्र वेगवेगळ्या रुग्णालयांची होती. नानावटी, लाईफलाईन, नेस्को बीएमसी लसीकरण केंद्र इत्यादी. यामुळे सोसायटीतील लसीकरण झालेल्या नागरिकांची शंका आणखी बळावली. त्यांनी प्रमाणपत्र मिळालेल्या रुग्णालयांशी संपर्क केला. त्यावेळी सोसायटीमध्ये लस पुरवत नसल्याचं रुग्णालयांनी सांगितलं.
यासंदर्भात नानावटी रुग्णालयाने निवेदन प्रसिद्ध केलं. ज्यात म्हटलं आहे की, नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नावाने कांदिवलीतील हाऊस सोसायटीतील नागरिकांना लसीकरण प्रमाणपत्र दिली गेली असल्याचं अलिकडेच निदर्शनास आलं आहे. नागरी सोसायट्यांमध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचं लसीकरण शिबीर आयोजित करत नाही, हे स्पष्ट करत असून, या प्रकरणी संबंधित विभागाला माहिती देण्यात आली आहे आणि तक्रारही नोंदवत आहोत,” असं नानावटी रुग्णालयाने स्पष्ट केलं.