शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (20:35 IST)

घरावर चक्क 150 किलो कांद्याची प्रतिकृती उभारली

onion
येवला तालुक्यातील धनकवाडी प्रगतिशील शेतकरी साईनाथ भगवंत जाधव व अनिल भगवंत जाधव या दोघे भावंडांनी कांद्यामुळे हक्काचे घर मिळाले याची जाणीव ठेऊन घरावर चक्क 150 किलो कांद्याची प्रतिकृती उभारली आहे. आज जे घर झाले आहे ते केवळ कांदा पिकामुळेच असाच संदेश त्यांना यामधून द्यायचा आहे. घरावरील 150 कांदा आता येणाऱ्या-जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे. 
 
धनकवाडी येथील प्रगतिशील शेतकरी साईनाथ भगवंत जाधव व अनिल भगवंत जाधव या दोघे भावंडांना मिळून तीस एकर शेती आहे पण येवला तालुका हा नेहमी दुष्काळी तालुका म्हणून राहिला आहे. या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे दहा ते पंधरा एकर शेतामध्ये कांद्याचे पीक घेतले खर्च वजा जाता पंधरा लाख रुपयांचा निव्वळ नफा शिल्लक राहिला या पैशांची करायचे काय तर दोन्ही भावांनी मिळून घर बांधण्याचा निर्णय घेतला. शेतात घर बांधले आणि कांदा हा लासलगाव बाजार समितीत विक्रीला नेला. त्यावेळी लासलगाव बाजार समितीच्या प्रवेशद्वारा समोर बाजार समितीने नुकतेच कांद्याची प्रतिकृती ही उभारली आहे. आपणही कांद्यातून चांगला नफा मिळाला असल्याने आपल्याही बंगल्याच्या छतावर ही कांद्याची प्रतिकृती असावी म्हणून या अनिल आणि साईनाथ जाधव या दोघे भावंडांनी कांद्याची प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेतला.
 
कशी सुचली संकल्पना?
 
कांदा पिकाच्या उत्पादनावरच जाधव बंधूनी भले मोठे घर हे शेतात बांधलेले आहे. कांदा पीक दराबाबत लहरीचे असले तरी परीश्रम आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी 15 एकरामध्ये कांद्याचे पीक घेतले. एवढेच नाही तर यामाध्यमातून त्यांना 15 लाख रुपये निव्वळ नफा मिळाला होता. दरम्यानच्या काळात त्यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर कांद्याची प्रतिकृती पाहिली होती. येथील बाजारपेठ ही अशिया खंडात कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे त्यांनी हे वेगळेपण केले तर ज्यामुळे आपले घर उभा राहिले त्या कांद्यासाठी त्यांनी हे अनोखा प्रयोग केला आहे. घरावरच कांद्याची प्रतिकृती उभारली आहे.
 
150 किलो वजन अन् 18 हजार रुपये खर्च
 
हौशेला मोल नाही त्याप्रमाणे जाधव शेतकरी बंधूंनी आपली हौस पूर्ण करुन घेतली आहे. यासाठी त्यांना 18 हजार रुपये खर्च आला पण आपले घर जे उभे आहे ते केवळ कांद्यामुळेच याची जाणीव ठेवण्यासाठी त्यांनी हा अट्टाहास केला आहे. या प्रतिकृती असलेल्या कांद्याचे वजन हे 150 किलो आहे. हा कांदा महाकाय असल्याने दूरवरुन जाणाऱ्यांचेही लक्ष वेधून घेत आहे.