सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (09:38 IST)

नवाब मलिक यांच्याविरोधात अॅट्रोसिटीची तक्रार दाखल

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात अॅट्रोसिटीची तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
 
ही तक्रार औरंगाबाद येथे मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाली असून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई गंगाधर भालेराव यांनी ही तक्रार केली आहे,
मंत्री नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांचे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, मलिक यांनी वानखेडे यांचं जात प्रमाणपत्रच बोगस असल्याचं सांगत ते मुस्लीम असल्याचा दावाही केला होता. वानखेडे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
 
दरम्यान, समीर यांच्या आत्या गुंफाबाई यांनी या प्रकरणात एन्ट्री घेत अॅट्रासिटीची तक्रार दाखल केली.
 
गुंफाबाई भालेराव यांच्या तक्रारीनुसार, "आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत, भाषणात समीर वानखेडे यांच्या कुटुंबांच्या जातीबद्दल वक्तव्य केले. नवाब मलिक यांनी खोटी माहिती पसरवली तसेच समीर यांची नोकरी जाईल, अटक होईल, अशा धमक्या सुद्धा दिल्या."
 
"आमच्या सर्व कुटुंबांना मलिक यांनी हानी पोहचवली आहे. मलिक यांनी कलम 3 (1) (क्यू) अ.जा. अ.ज. (अत्याचार प्रतिबंधक) कायदा 1989 प्रमाणे प्रथम दर्शनी गुन्हा केलेला आहे. त्यामुळे यांच्यावर कायदेशीररीत्या गुन्हा नोंदवावा तसेच कारवाई करावी," अशी मागणी समीर वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई गंगाधर भालेराव यांनी केली.