शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 5 ऑगस्ट 2019 (08:59 IST)

भुजबळ यांच्याविरोधात ठकबाजीचा गुन्हा दाखल

files cheating case against Bhujbal
गिसाका येथील आर्मस्ट्राँग इन्फास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड कंपनीला फायदा पोहोचविण्यासाठी सरकारी कागदपत्रात फेरफार केल्याप्रकरणी दाभाडीचा तलाठी व कंपनीचे संचालक माजी खासदार समीर मगन भुजबळ यांच्याविरोधात छावणी पोलिस ठाण्यात ठकबाजीचा गुन्हा दाखल झाला आहे. समीर भुजबळ राष्ट्रवादीचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे आहे.
 
शिवाजी सीताराम पाटील (४८) या शेतकर्‍याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. दाभाडी शिवारातील गट नंबर १२०/७९९ ही पाटील यांची आई निंबाबाई सीताराम पाटील यांची वडिलोपार्जित शेती आहे. या जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर इतर अधिकारात त्यांचे नाव आहे.
 
दाभाडीचे तलाठी पी. पी. मोरे यांनी आर्मस्ट्राँग कंपनीच्या फायद्यासाठी शेत गट नंबर १२०/७९९ च्या सातबारा उतार्‍यावर जुलै २०१४ मध्ये एकाच महिन्यात पडित व पीकपेरा असा वेगवेगळा शेरा मारुन तो अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला! तलाठ्याने आर्थिक फायद्यासाठी अधिकाराचा गैरवापर करुन सरकारी कागदपत्रात फेरफार केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
 
या प्रकरणाची महसूल विभागाने चौकशी केली त्यात तलाठी मोरेंवरचे आरोप सिद्ध झाले. त्यानंतर अन्वये छावणी पोलिस ठाण्यात तलाठी मोरे व कंपनीचे संचालक समीर भुजबळ यांच्याविरुद्ध सीआरपीसी १५६ (३) अंतर्गत ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक जी. के. आखाडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.