गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: सोमवार, 5 ऑगस्ट 2019 (08:17 IST)

राज यांच्या ईव्हीएम विरोधात आंदोलनाचा काही एक फरक पडणार नाही

ईव्हीएम विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देशभरातील नेत्यांची भेट घेत असल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत. विरोधक मिळून ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार आहेत. तर त्या आंदोलनाचा काहीच फरक पडणार नाही. अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. “राज ठाकरे यांच्याकडे काही उद्योग राहिला नसून, म्हणून ते देशभरातील नेत्यांच्या भेट घेत आहेत. नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यापेक्षा राज्यात मनसे कशी वाढेल याकडे लक्ष द्यावे,” असा सल्ला यावेळी रामदास आठवले यांनी दिला. ईव्हीएम बाबत राज ठाकरे यांच्या विधानावर त्यांनी भूमिका मांडली. “ईव्हीएम मशीन हे काँग्रेसच्या काळात आले आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणले नाही. त्यामुळे ईव्हीएमबाबत विरोधकांनी काहीच बोलता कामा नये. मतदानावेळी लोकांचा हात आपणहून कमळाकडे जात असून, कोणी काही करू शकत नाही,” असे आठवले यावेळी म्हणाले आहेत. सोबतच बारामतीत ईव्हीएम मशीन खराब नव्हते का? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, ”ईव्हीएम मशीनचा मुद्दा जाणीवपूर्वक काढला जात आहे. बँलेट पेपरवर निवडणुका घेतल्यास आमची तयारी आहे.”