सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 ऑगस्ट 2020 (15:32 IST)

कोल्हापूरात पुराची स्थिती; 102 बंधारे सध्या पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यातही पुराची स्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानं चिंता वाढली आहे. तसेच राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झालाय. एवढच नाही तर नदीतील पाणी पातळीत वाढ झाल्यानं जिल्ह्यातील १०२ बंधारे सध्या पाण्याखाली गेली आहेत.
 
कोल्हापूर शहरात काही प्रमाणात पाऊस कमी झाला असला तरी धरण क्षेत्रात मात्र अजूनही पावसाचा जोर कायम आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून बहुतांशी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. सध्या पाणी ४३ फुटांवरून वाहत आहे. यामुळे प्रयाग चिखली आंबेवाडी येथील लोकांचे स्थलांतर सुरू आहे.
 
जिल्ह्यातील अनेक मार्गावर पाणी आल्यामुळे ४० पेक्षा अधिक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत. काही गावात पुराचे पाणी घुसले असून जनजीवन विस्कळीत झालय. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन एनडीआरएफची दोन पथके कोल्हापुरात तैनात करण्यात आली आहेत.
 
नरसिंह वाडी येथील दत्त मंदिरात पाणी पोहोचल्याने पहिला दक्षिणद्वार झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या अनेक नद्यांमध्ये वाढत असलेल्या पाण्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोल्हापूर ते गगनबावडा या रस्त्यावर पाणी आल्यामुळे या मार्गावरून कोकणात जाणारा रस्ता बंद झाला आहे. याशिवाय निपाणी आजरामार्गे गोव्यात जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. केर्ले ते केर्ली या रस्त्यावर पाणी आल्यामुळे रत्नागिरीकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे.