सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 ऑगस्ट 2020 (15:33 IST)

पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये पुराचा धोका

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. कोल्हापूरमध्ये दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर पंचगंगा पाणीपातळी आता 35 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा पूरपरिस्थीती निर्माण झाली आहे. मोठी पूरपरिस्थिती उद्भवणार असल्याचा इशारा कोल्हापूरमध्ये देण्यात आला आहे. पावसामुळे शेकडो गावाचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.

पावसाच्या हाहाकारामुळे जिल्ह्यातील तब्बल 88 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सलग दोन दिवस पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 32 फुटांवर गेली असून 39 फूट ही नदीची इशारा पातळी आहे. त्यामुळे एका रात्रीत दहा फूट पाणी वाढल्याने कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे.

पहाटेपासून पुन्हा पावसाचा जोर कायम आहे. तिलारी दाजीपूर गगनबावडा भागात गेल्या चोवीस तासांत अतिवृष्टी झाली आहे. तर राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, दरम्यान, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकाचवेळी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पाऊस पुन्हा परतला आहे. सध्या मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर असला तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा फारसा जोर नाही, त्यामुळे शेतकरीही चिंताग्रस्त आहे.