बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जुलै 2020 (14:17 IST)

गॅस सिलेंडरवर मिळणारी सबसिडी बंद? काय आहे कारण

काही महिन्यांपासून एलपीजी LPG गॅस सिलेंडरवर मिळाणारी सबसिडी (LPG Gas Subsidy) अनेकांच्या बँक खात्यात आली नसल्याचं समोर आलं आहे. सरकारकडून मे महिन्यापासून सबसिडी देण्यात आली नसल्याचं बोललं जात आहे. घरा-घरात गॅस सिलेंडर पोहचवण्याच्या हेतूने सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजना सुरु केली. गरिबांना स्वस्त दरात एलपीजी सिलेंडर देण्यासाठी सबसिडी सुरु करण्यात आली. परंतु आता सिलेंडरवर मिळणारी सवलत जवळपास बंद झाल्याची शक्यता आहे.
 
केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने एक ट्विट केलं आहे. त्यात, 'गॅल सिलेंडरचं बाजार मूल्य म्हणजेच विना सबसिडी सिलेंडरची किंमत कमी झाली आहे. या दरम्यान अनुदानित अर्थात सबसिडीवाल्या सिलेंडरच्या (LPG Gas Subsidy) किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे दोन्ही सिलेंडरच्या किंमती जवळपास समान झाल्या आहेत. या कारणामुळे मे-जून महिन्यात सिलेंडरवर मिळणारी सबसिडी बंद आहे.
 
दिल्लीमध्ये गेल्या वर्षी जुलै महिन्यात 14.2 किलोग्रॅम गॅस सिलेंडरचं बाजार मूल्य (Market rate), म्हणजे विना सबसिडी सिलेंडरची किंमत 637 रुपये होती. जी कमी होऊन आता 594 रुपये झाली आहे. त्याउलट, सबसिडीवाल्या सिलेंडरच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजे 494.35 रुपयांत मिळणाऱ्या सिलेंडरची किंमत वाढून 594 रुपये झाली आहे. त्यामुळे सबसिडी आणि विना सबसिडी सिलेंडरची किंमत समान आहे.
 
देशात उज्ज्वला योजनेअंतर्गत 8 कोटी लोकांना गॅस सिलेंडर सबसिडीचा लाभ मिळतो. अधिकतर महानगरांमध्ये सबसिडी जवळपास बंद झाल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. परंतु काही दूर भागात राहणाऱ्या लाभार्थिंना अतिशय कमी 20 रुपयांपर्यंतची सबसिडी दिली जात आहे.
 
2019-20 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने 34,085 कोटी रुपये एलपीजी सबसिडीसाठी दिले होते. तर 2020-21 साठी जवळपास 37,256.21 कोटी रुपये देण्यात आले आहेत.