राम मंदिर उभारणीचे काम तुर्त थांबविले
सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर उभारणीचं काम तुर्तास थांबवण्यात येणार असल्याची माहिती राम मंदिर ट्रस्टकडून देण्यात आली आहे. भारत-चीन सीमेवरील परिस्थिती गंभीर आहे आणि देशाचे संरक्षण करणे ही सर्वात महत्त्वाचं आहे, असं राम मंदिर ट्रस्टनं म्हटलं आहे.
राम मंदिर प्रश्नी मागील वर्षी न्यायालयाकडून ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर राम मंदिराच्या उभारणीसाठी एका ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती. दरम्यान, राम मंदिर ट्रस्टनं भारत चीन सीमेवरील तणावाबाबत चिंता व्यक्त केली. तसंच नव्या तारखेचीही घोषणा करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती दिली. “मंदिराचे बांधकाम सुरू करण्याचा निर्णय देशातील परिस्थितीनुसार घेतला जाईल आणि अधिकृतपणे जाहीर केला जाईल,” अशी माहिती ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी पीटीआयशी बोलताना दिली. दरम्यान, यावेळी राम मंदिर ट्रस्टकडून जवानांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली.