गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 जून 2020 (08:52 IST)

कोरोना व्हायरसच्या काळात शाहू महाराजांकडून काय शिकण्यासारखं आहे?

- प्राजक्ता धुळप
26 जून हा राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिन. अवघं 48 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या शाहू महाराजांनी सर्वांसाठी शिक्षण, जातीभेदावर प्रहार, स्त्रियांच्या हक्कांसाठी कायदे, दुष्काळ निवारण, पायाभूत सुविधा आरोग्य व्यवस्था आणि शेती-उद्योग क्षेत्रात अनेक कल्याणकारी निर्णय घेतले.
 
भीती आणि अनिश्चिततेचं सावट घेऊन आलेल्या प्लेगच्या साथीत शाहूंनी जनतेला दिलासा दिला. इतकंच नाही तर त्यांनी केलेल्या उपाययोजना कोल्हापूर संस्थानातले मृत्यू कमी करण्यात यशस्वी ठरल्या होत्या.
 
मुंबईत 1896 साली प्लेगच्या साथीने थैमान सुरू केलं. त्यानंतर पुण्यातही प्लेगचा हाहाकार माजला. दोन वर्ष मुंबई-पुण्यात ब्रिटिशांच्या राजवटीखालील प्रशासनाने प्लेगला रोखण्यासाठी कठोर प्रयत्न सुरू केले होते. फेब्रुवारी 1897मध्ये संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला.
 
तेव्हाच्या मुंबई इलाख्यात या साथीमुळे हजारो लोक मरण पावले. तर पुण्यात दिवसाला पाचशेहून अधिक लोक मृत्युमुखी पडत होते अशा नोंदी आहेत. प्लेगने सातारा आणि बेळगावच्या खेड्यापाड्यातूनही कहर उडवून दिला होता.
 
चैत्र महिन्याच्या पोर्णिमेला साधारण एप्रिल महिन्यात दरवर्षी जोतीबाची यात्रा भरते. शाहू महाराजांनी 10 मार्च 1897ला एक जाहीरनामा प्रसिद्ध केला.
 
'मुंबई, पुणे वगैरे बऱ्याच ठिकाणी ग्रंथी संनिपात तापाचा आजार (ब्युबॉनिक प्लेग) सुरू असून काही ठिकाणी पटकीच्या आजाराचीही सुरुवात झाली आहे व शिवाय दुष्काळचे कारणानें वैरणीची तूट सर्वत्र असून ती फार महाग मिळते व कोठें कोठें मुळींच मिळत नाही, या सर्व कारणांकरिता येत्या चैत्र शुद्ध 15 रोजी कोल्हापूरनजीक वाडी रत्नागिरी उर्फ जोतीबाचे डोंगरावर होणारी श्री केदारलिंगची यात्रा बंद करण्यांत आली असून तेथें कोणाही यात्रेकरुस जाऊं दिले जाणार नाहीं.'
 
शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाचा राज्यकारभार हाती घेऊन अवघी तीन वर्षं झाली होती. तेव्हा त्यांचं वय होतं 22-23 वर्ष. राज्यावर दुष्काळी संकट कोसळलं होतं. महाराजांचे दुष्काळी दौरेही सुरू होते.
 
या काळात त्यांनी स्वतंत्र दुष्काळ निवारण खातं, तालुक्याच्या ठिकाणी उभारलेली मदतकेंद्र, धान्यवाटप योजना, व्यापाऱ्यांसाठी साहाय्य, विहिर-बंधारे-तलाव आणि धरणाचं बांधकाम, दुष्काळी भत्ता असे अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले होते. हाच सहवेदना (empathy) असलेला दृष्टीकोन शाहूंच्या प्लेग प्रतिबंधक कामात दिसून येतो.
 
प्रजेसाठी प्लेगविषयी शास्त्रशुद्ध माहिती
प्लेगसारख्या अकल्पित आणि अचानक उद्भवलेल्या आजाराने लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्यात त्याकाळी समाजावर अंधश्रद्धांचा पगडा होता. साहजिकच हा आजार म्हणजे देवीचा कोप आहे असा लोकांचा समज होता.
 
प्लेगचा संसर्ग रोखण्यासाठी हा समज काढून टाकणं गरजेचं होतं आणि म्हणूनच शाहूंनी आजाराची शास्त्रशुद्ध माहिती देणारी हजारो पत्रकं गावोगावी वाटली. निरक्षर लोकांची संख्या अधिक असल्याने गावागावांमध्ये सभा भरवून त्याचं वाचनही करवून घेतलं.
 
सरकारी उपाययोजनांची माहिती पोहचवण्यासोबतच लोकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे, याविषयीही जाहिरनामे वेळोवेळी प्रसिद्ध केले. प्लेगचा उद्रेक पाहता कोल्हापूर संस्थानचे दिवाण रघुनाथराव व्यंकोजी सबनीस यांची प्लेग कमिशनर म्हणून नेमणूक करण्यात आली. दोन वर्षांनंतर भास्करराव जाधव यांनी प्लेग कमिशनरपदाची सूत्रं सांभाळली.
 
प्लेगचा अॅक्शन प्लॅन
कोल्हापूरच्या सीमेवर तपासणी सुरू करण्यात आली होती. आणि प्लेगच्या रुग्णाची माहिती सांगणाऱ्या व्यक्तीला बक्षिसही जाहीर करण्यात आलं होतं. कोल्हापूर शहरात प्लेगने शिरकाव केल्यानंतर लोकांनी नेमकं काय करायला हवं याविषयीचा जाहिरनामा (8 फेब्रुवारी 1899) सरकारचा आणि लोकांचा अॅक्शन प्लॅन सांगतो.
 
'तमाम लोकांस कळावायाकरिता प्रसिद्ध करण्यात येते की, करवीर इलाख्यात प्लेगच्या आजाराचा हळूहळू बराच शिरकाव होत चालला आहे. त्यामुळे करवीर शहरात एखादे वेळी कोणीतरी इसम चोरून येऊन एखादी प्लेग केस होऊन आजार सुरु होण्याची बरीच भीती आहे.
 
सदर आजार सांसर्गिक असल्याने, आजार झालेले ठिकाण ताबडतोब लोकांनी सोडल्यास त्या लोकांत पुढे त्याचा जास्त फैलाव बरेच अंशी होत नसल्याचे अनुभवास आले आहे. जी जी घरे मोकळी करण्याबद्दल इकडून हुकूम होईल, ती ती ताबडतोब 24 तासांचे आत मोकळी करून गावाबाहेर राहण्यास निघाले पाहिजे. त्याबद्दल कोणाचीही तक्रार ऐकली जाणार नाही.
 
असे करण्यास लोकांस आपली इस्टेट जिनगी वगैरेबद्दलची ताबडतोब व्यवस्था लावण्यास अडचण पडेल, तरी ज्याची इच्छा आपली इस्टेट जिनगी सरकारच्या ताब्यात देण्याची असेल त्यांनी आपली चीज, वस्तू इस्टेट जिनगी एका मोहरबंद पेटीत घालून त्यावर आपली मोहोर ठोकून बाहेर निघण्याबद्दल हुकूम होताच पेटी कोल्हापूर येथील खजिन्यात ठेवण्यासाठी रावसाहेब हुजूर खजानीस यांचे स्वाधीन करुन त्यांचे सहीची पावती घ्यावी.'
 
प्लेगवरील उपचारांसाठी दवाखाना
प्लेगची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोल्हापूरच्या कोटातीर्थ भागात हॉस्पिटल उभारण्यात आलं होतं.
 
प्लेगवर कोणतंही औषध उपलब्ध नव्हतं आणि प्रतिबंधात्मक लशीचाही शोध लागायचा होता. शाहू महाराज स्वतः होमिओपॅथीचे औषधोपचार घेत. होमिओपॅथीमध्ये प्लेगवर उपचार असल्याची माहिती कळताच शाहूंनी सार्वजनिक दवाखाना काढला. तो देशातला पहिला सार्वजनिक होमिओपॅथी दवाखाना ठरला.
 
स्थानत्याग केला सक्तीचा
दरबारचे आदेश न मानणाऱ्यांवर दंड तसंच जप्तीचा कायदेशीर बडगा उगारला जाई. लोकांना जबाबदारीची जाणीव करून देण्यासोबतच त्यांना साथीच्या आजारात सक्षम करण्यासाठी प्रशिक्षणाची जोड दिली. लागण झालेल्यांसाठी गावाबाहेर झोपड्या बांधणं बंधनकारक होतं. आधीच दुष्काळाचा फटका बसल्याने गरजूंना दरबारामार्फत झोपडी बांधण्यासाठी साहित्य पुरवलं जाई.
 
त्यावेळच्या शहरात म्हणजे तटबंदीच्या आतील वस्तीतल्या लोकांना सप्टेंबर 1899मध्ये स्थानत्याग करायला लावला. स्थानत्याग म्हणजे आपली राहती घरं सोडून लोकांनी तात्पुरत्या क्वारंटाईन छावण्यांमध्ये आपला मुक्काम हलवला. साडेतीन महिन्यांनंतर म्हणजे 2 जानेवारी 1900 चा जाहिरनामा सांगतो- 'प्लेग प्रतिबंध व शमनाचा सुलभ व खात्रीचा उपाय जो स्थानत्याग, त्याचा अवलंब आमच्या बहुतेक करवीरवासी लोकांनी वेळीच केला'.
 
लॉकडाऊन उठवण्यापूर्वी...
स्थानत्यागानंतरची पुढची पायरी दरबारने याच जाहिरनाम्यात घोषित केली. सर्व लोकांनी गाव सोडल्याने डिसइनफेक्शनचे काम हाती घेण्यात येईल. डिसइनफेक्शन हा इंग्रजी शब्द जाहिरनाम्यात असाच वापरण्यात आलाय. डिसइनफेक्शन बद्दल माहिती हवी असल्यास ती देखील सेंटर प्लेग ऑफीसमध्ये उपलब्ध करण्यात आली होती.
 
शहरात दुकानं उघडली तर संसर्ग होण्याची भीती आहे त्यामुळे नदीजवळ जी जागा निश्चित केली गेली तिथेच लोकांना किराणा मिळण्याची सोय शाहूंच्या प्रशासनाने म्हणजेच दरबारने केली होती.
 
लॉकडाऊनच्या या दिवसांमध्ये हातावर पोट असणाऱ्यांचा रोजगार बुडतो याची जाणीव शाहूं महाराजांना होती. अशा मजुरांसाठी कळंब तलावावर सरकारने झोपड्या बांधल्या आणि तलावाच्या कामावर मजूरी मिळेल अशी तजवीज केली. यावरून रोजगार हमी योजनेचं उद्दीष्ठ शाहूंनी सव्वाशे वर्षापूर्वीच गाठल्याचं दिसतं.
 
लॉकडाऊन उठण्यापूर्वी (फेब्रुवारी 1900) डिसइनफेक्शन कोणत्या पद्धतीने आणि टप्प्याटप्प्याने कसं करावं याविषयी करवीर शहरातल्या लोकांना सूचना केल्या गेल्या. त्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी दिला गेला.
 
दरबारचे सर्जन मेजर जॉर्ज यांनी लिहिलेल्या 'प्लेगच्या आजाराविषयी संक्षिप्त टिपणे' या पुस्तकातून घरात कपडे, भांडी, वस्तू, धान्य यांचं निर्जंतुकीकरण कसं करावं याची तपशीलवार माहिती दिली. अतिगरीबीमुळे ज्यांना रसकापूर नावाचं निर्जंतुकीकरणाचं द्रव्य परवडू शकत नाही अशांसाठी मोफतही उपलब्ध करून दिलं. आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे पुन्हा आपल्या घरात राहण्यासाठी, तसंच व्यापारधंदा सुरू करण्यासाठी कमिशनरकडून पास घेणं बंधनकारक होतं.
 
कोल्हापूरमध्ये प्रतिबंधात्मक (Preventive) उपाय योजल्यामुळे इतर शहरांच्या मानाने कमी हानी झाली. शाहू महाराजांचे शिक्षक सर स्टुअर्ट मिटफोर्ड फ्रेजर यांना याविषयीच्या बातम्या कळल्यानंतर त्यांनी शाहूंना कौतुकाचं पत्र लिहिलं- 'I am gratified to read in the papers how highly your subjects appreciate your personal excursions in the matter of plague and famine. Stick to it, maharaja, this is the time to show what a man is made of'
 
रयतेचा राजा म्हणून ओळख मिळवलेल्या राजर्षी शाहू महाराजांनी प्लेगची साथ रोखण्यासाठी प्रशासन राबवलं तो दृष्टीकोन आजच्या काळालाही लागू होतो.
 
(संदर्भ: डॉ. जयसिंगराव पवार लिखित 'राजर्षी शाहू छत्रपती: एक मागोवा', 'राजर्षी शाहू छत्रपतींचे जाहीरनामे आणि हुकूमनामे', धनंजय कीर लिखित शाहू महाराजांचे चरित्र, कोल्हापूर गॅझेट, मराठी विश्वकोश)