बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (11:52 IST)

नाशिकला पुराचा धोका, सतर्कतेचे आव्हान

नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. निवासी उपजिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत डोईफोडे यांनी नागरिकांना या वेळी सावध राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच धरणांमधून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. 
 
गंगापूर धरणातून १५ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येणार असल्याने गोदावरी नदीला पूर येणार आहे. नदी लगतच्या रहिवाशांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
 
जिल्ह्याच्या काही भागात 29 सप्टेंबर रोजी गडगडाटी वादळासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान केंद्राने दिला असून या संबंधात, नागरिकांनी जीवित आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षित ठिकाणी राहणे आवश्यक आहे. 
 
पूरप्रवण भागातील सर्व गावे, नदी-नालाकाठ परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोणीही नदी आणि धरणात प्रवेश करू नये, आपले पशुधन आणि वाहने सुरक्षित ठिकाणी ठेवावे अशा सूचना दिल्या गेल्या आहेत. प्रशासनाने गावांना सावध करण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आवाहन संबंधित संस्थांना केले आहे.