गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 जुलै 2021 (13:00 IST)

चिपळूण शहराला पुराचा तडाखा, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

गेल्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी, कोल्हापूर, अकोला अशा विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे आपत्ती व्यवस्थापन सतर्क झाले आहे.
 
राज्यात एकूण या ठिकाणी NDRF ची 9 पथके रवाना करण्यात आली आहेत.
 
कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 36 फुटांवर पोहोचली असून अनेक सखल भागात पाणी साठायला सुरुवात झाली आहे. अलमट्टी धरणातून 97 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पूरपरिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मदत होणार आहे.
 
तसेच 77 बंधारे पाण्याखाली गेल्याने जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून NDRFला पाचारण करण्यात आले असून दुपारपर्यंत पथक जिल्ह्यात दाखल होणार आहे.
 
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड शहरामध्ये पुराचा पाणी शिरलं आहे. भरती आणि अतिवृष्टीची वेळ एकत्र आल्यामुळे खेड आणि चिपळूणमध्ये परिस्थिती गंभीर झाली. अनेक लोक अपार्टमेंटमध्ये अडकले आहेत. चिपळूण नगरपालिकेच्या 2 बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे.
 
रत्नागिरीमधून 1, पोलीस विभागाकडील 1 व कोस्टगार्डची 1 बोट अश्या 3 बोटी रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाठवल्या आहेत.पुण्यातून NDRF च्या दोन टीम पुणे ( खेड साठी 1 व चिपळूण साठी 1)येथून रेस्क्यू ऑपरेशनसाठी निघालेल्या आहेत तटरक्षक रक्षक दलाला हेलिकॉप्टर मदतीसाठी समन्वय करणेत येत आहे, याबद्दलची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
काल अकोला जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. मुसळधार पावसामुळं शहरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले तर खडकी भागातील न्यू खेताण या परिसरातील 30 घरं पाण्याखाली आले आहे.
 
स्थानिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात 202.9 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.
 
पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेतीचही मोठं नुकसान झालं आहे. शेतांमध्ये पाणी साचले आहे, शेती खरडून निघाली आहे.
 
पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील बहुतांश भागातील बत्ती गुल आहे. काल रात्रीपासून बचाव पथक तैनात आहे. तर नागपूरहून विशेष बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं आहे.
 
संततधार पावसाने नांदेडच्या सहस्त्रकुंड इथल्या धबधब्याला रौद्र रूप प्राप्त झालं आहे. सध्या नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे.
 
त्यामुळे पैनगंगा नदीचे पात्र दुथडी भरून वाहतेय, त्यामुळे सहस्रकुंड धबधब्याचे असे दुर्मिळ दृश्य आज सकाळपासून पाहायला मिळत आहे.
 
महाबळेश्वर तालुक्याला पावसाचा तडाखा
मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा महाबळेश्वर तालुक्याला बसला असून तालुक्यातील जनजीवन आता विस्कळीत होऊ लागले आहे.
 
मुसळधार पावसाने महाबळेश्वरचा वेण्णा तलाव काल पासूनच ओसंडून वाहू लागल्याने तलावाचे सर्व पाणी बाहेर रस्त्यावर आल्याने काल काही काळ महाबळेश्वर कडून पाचगणीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती नंतर ही वाहतूक संथगतीने सुरू आहे.
 
महाबळेश्वर तालुक्याच्या आजूबाजूला असणाऱ्या गावांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात शेतांमध्ये पाणी शिरू लागले आहे.
 
प्रतापगड भागातसुद्धा पावसाचा जोर अधिक असल्याने या भागातील चतुरबेट पूल आता पाण्याखाली गेला आहे. हा पूल पाण्याखाली गेल्याने जवळपास 15 गावांचा संपर्क आता तुटला आहे.
 
मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
मुख्यतः मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याने अतिमहत्त्वाच्या सेवेत काम करणाऱ्यांना आपलं कार्यालय गाठणं अशक्य झालं.
 
21 जुलैच्या रात्री इगतपुरी ते कसारा दरम्यान रेल्वे ट्रकवर दरड कोसळली. यामुळे इथून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक खोळंबली.
 
उंबरमाळी रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडलीय. सध्या ही दरड हटवण्याचं काम सुरू आहे. कोकणातल्या प्रत्येक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय.
 
कोल्हापूरमध्ये पाण्याची पातळी वाढली
 
कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद. रस्त्यावर पाणी आल्याने अनेक मार्ग बंद करावे लागले आहेत. तर, ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण, बदलापूर इथे उल्हास नदीचं पाणी शहरात शिरण्यास सुरुवात झाली.
 
उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने वांगणी - बदलापूर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी आलं असून इथली रेल्वे वाहतूक ठप्प झालीय. कर्जतमध्ये रस्त्यावर आणि घरांमध्ये उल्हास नदीचं पाणी शिरायला लागलंय.
 
इथे अनेक ठिकाणी इमारतींमधली वाहनं पूर्णतः पाण्यात गेलीयत. तर, कल्याण जवळच्या खाडीतलं पाणी वाढल्याने स्थानिक म्हशीच्या गोठ्यांमध्ये पाणी शिरलं. यामुळे सगळ्याच म्हशींना रस्त्यावर आणावं लागलंय.
 
कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून पंचगंगा नदीची पाणीपातळी 36 फुटांवर पोहोचलीय.