जंक फूडसाठी नवीन नियम: शाळा आणि त्याच्या ५० मीटर परिसरात विक्री बंद असलेल्या जंक फूडसंदर्भात FSSAI ने मसुदा जारी केला
शाळा आणि त्याच्या ५० मीटर परिसरात विक्री बंद असलेल्या जंक फूडसंदर्भात एफएसएसएआयने (FSSAI) नवीन नियमांचा मसुदा जारी केला आहे. यामध्ये मीठ, साखर आणि फॅटचे प्रमाण तपासूनच दर्जा ठरवला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भारतात शालेय मुलांच्या आरोग्यासाठी आणि चांगल्या आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी FSSAI द्वारे शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीवर आणि जाहिरातींवर बंदी घालणारा एक नवीन मसुदा तयार करण्यात आला आहे. तसेच शाळांचे प्रवेशद्वार, कॅन्टीन, मेस आणि वसतिगृहांच्या ५० मीटरच्या परिसरात मीठ, साखर आणि फॅट असलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे निर्बंध असतील.तर सध्या चिप्स, बिस्किटे, शीतपेये किंवा पॅकेज्ड स्नॅक्सवर सरसकट बंदी घातलेली नाही. या पदार्थांमधील मीठ, साखर आणि फॅटचे प्रमाण किती आहे, यानुसार ते आरोग्यासाठी हानिकारक आहे की नाही हे ठरवले जाईल.
तसेच केवळ स्नॅक्सच नाही, तर नारळपाणी, ताक, फळांचा रस, लस्सी, चहा आणि कॉफी यांसारख्या पेयांचीही पोषण मूल्यांच्या आधारे तपासणी केली जाईल. माहितीनुसार मुलांना आकर्षित करणाऱ्या जंक फूडच्या सर्व प्रकारच्या जाहिरातींवर शाळा परिसरात पूर्ण बंदी असेल. या नियमांची अंमलबजावणी करण्याची आणि त्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारांच्या अन्न सुरक्षा विभागावर असेल. महाराष्ट्रात तर अन्न व औषध प्रशासनाने या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी शाळा आणि दुकानदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून मुलांच्या टिफिनमध्ये आणि शाळांमधील कॅन्टीनमधून जंक फूड पूर्णपणे हटवता येईल. अशी माहिती समोर आली आहे.
Edited By- Dhanashri Naik

