गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (16:01 IST)

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, वकिलाला अटक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील वसुली प्रकरणाच्या तपासत बुधवारी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयनं  अटक केली आहे. त्यांना ट्रान्जिस्ट रिमांडवर घेऊन सीबीआयचे पथक दिल्लीला रवाना झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना दिल्लीतील सीबीआय न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
 
अनिल देशमुख यांच्याविरोधातील वसुली प्रकरणाच्या चौकशी अहवालात छेडछाड केल्याप्रकरणी सीबीआयच्या पथकाने मुंबई विमानतळाबाहेरुन एका व्यक्तीला ताब्यात घेतले. ती व्यक्ती देशमुख यांच्या लीगल टीममधील होती. याबाबतच वृत्त एएनआयनं दिलं होतं. २९ ऑगस्टला माध्यमांमधून अनिल देशमुख यांना सीबीआयनं क्लीनचीट दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. सीबीआय चौकशीचा हा प्राथमिक अहवाल लीक झाल्यानं त्यावरुन या बातम्या दिल्या गेल्या होत्या. अनिल देशमुख यांनी कुठलाही दखलपात्र गुन्हा केलेला नाही. असं या अहवालात म्हंटले होते. बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सीबीआयने याचा इन्कार करत हा अहवाल कसा फुटला याची चौकशी सुरु केली होती. त्यावेळी सीबीआयच्या काही कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना देशमुख यांच्या लीगल टीमने लाच देण्याचा प्रयत्न केला होता असे चौकशीत स्पष्ट झाले.