शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (12:11 IST)

कोल्हापुरात तलाव फुटला, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड या डोंगराळ तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे तलाव फुटल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एक महिला वाहून गेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच पिकाचे मोठे नुकसान झाले असून जनावरे, वाहनेही वाहून गेली आहे.
 
बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून हा प्रकल्प फुटल्याने अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहातून नवले गावातील एका 55 वर्षीय महिला वाहून गेल्याचा समाचार आहे. तर काहीजणांना बचावण्यात यश आले आहे. 
 
या फुटलेल्या तलावातील पाण्यामुळे तलाव परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून रस्ते सुद्धा वाहून गेले आहे. यामुळे आजूबाजूच्या काही गावाचा संपर्क तुटला आहे. 
 
या दुर्घटनेत नवले गावातील जिजाबाई मोहिते यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास मेघोली तलाव फुटल्याने शेत, घरे, गोठ्यात पाणी शिरले. प्रकल्प फुटल्याची माहिती कळताच रात्रीत झोपत असलेले नागरिक उठून ओढ्याच्या दिशेने धावले. अनेकांनी बचावकार्यासही सुरुवात केली. 
 
नवले येथील धनाजी मोहिते यांच्या गोठ्यात पाणी शिरल्यावर ते स्वत: त्यांची पत्नी, जिजाबाई, मुलगा, नातू गोठ्यात गेले. जनावरांची सुटका करताना सर्वजण पाण्यात वाहून गेले. यात धनाजी मोहिते, त्यांचा मुलगा आणि नातू झाडाला धरून बसल्याने ते वाचले पण त्यांच्या पत्नी जिजाबाई वाहून गेल्याचे कळते. 
 
तलाव फुटल्याने मेघोली, नवले, सोनुर्ली, ममदापूर, वेंगरुळ या गावांचे मोठे नुकसान झाले आहे. नवले येथील निवृत्ती शिवा मोहिते यांच्या गोठ्यातील चार जनावरे मृत्यूमुखी पडल्याने मोठे नुकसान झाल्याचे कळते.
 
पुराचं पाणी आजूबाजूच्या शेतात घुसलं. यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. रात्रीच्या सुमारास तलाव फुटल्यानंतर नागरिकांनी गावच्या ओढ्याकडे धाव घेत पाहणी केली. रात्रीच्या सुमारास पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लागत नव्हता, मात्र सकाळ होताच शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले हे कळून येत आहे तसेच पाणी बघण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोकांनी सकाळी मोठी गर्दी केली.
photo: symbolic