शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जानेवारी 2021 (15:47 IST)

बुलेट ट्रेन दिल्यामुळं जपानच्या माजी पंतप्रधानांना पद्म पुरस्कार: राऊत

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारावरून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालं आहे. बुलेट ट्रेन दिल्यामुळं जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पुरस्कार मिळाला असावा,' असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
 
देशातील एकूण ११९ मान्यवरांना केंद्र सरकारनं काल पुरस्कार जाहीर केले. त्यापैकी महाराष्ट्रातील सहा व्यक्तींचा पद्म पुरस्कारानं गौरव करण्यात आला आहे. 
संजय राऊत यांनी पद्म पुरस्कारावर प्रतिक्रिया दिली आहे. 'ज्यांना पद्म पुरस्कार मिळाले ते पात्र असतीलच. त्यांचं मी अभिनंदन करतो,' तसेच बुलेट ट्रेनसाठी सहकार्य करणारे जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना पुरस्कार देण्यामागचं कारण हेच असावं, असा अंदाज राऊत यांनी व्यक्त केला आहे.
 
प्रत्यक्षात महाराष्ट्र सरकारनं ९८ नावांची शिफारस केंद्र सरकारकडं केली होती. महाराष्ट्रातून केवळ सहा व्यक्तींची निवड झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'महाराष्ट्र राज्य इतकं मोठं आहे. इथे अनेक लोक वेगवेगळ्या क्षेत्रांत चांगली कामं करत आहेत. असं असताना फक्त सहा जणांनाच पुरस्कार का? असा प्रश्न राऊत यांनी केला.
 
राज्य सरकाराने शिफारस केलेल्या नावांच्या यादीत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचंही नाव होतं.