गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 जून 2021 (16:34 IST)

माजी आमदार डॉ. सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतणार

भाजपाचे माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी, १९ जून रोजी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवशी अधिकृतपणे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याच दिवशी मुंबईतील काँग्रेसच्या नूतनीकरण झालेल्या टिळक भवनाचेही उद्घाटन आहे. त्याच सोहळ्यात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
 
“राजकीय जन्मच काँग्रेसमध्ये झाल्यामुळे परतीचे वेध लागले होते. त्यामुळे पुढील राजकीय भवितव्याचा विचार करता स्वगृही परत जाण्याचा निर्णय घेतला,” असं डॉ. सुनील देशमुख यांनी सांगितलं आहे. “काँग्रेस सोडून जाण्याची तेव्हाही इच्छा नव्हती. पण त्यावेळी राजकीय परिस्थितीने तशी कलाटणी घेतल्यामुळे तसा निर्णय घ्यावा लागला. भाजपामध्ये सन्मानाची वागणूक मिळाली. मनामध्ये कुठलीही कटुता नाही,” असंही त्यांनी सांगितलं.
 
आता काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पुढे काय, असा प्रश्न विचारला असता, “सध्या काहीच ठरविलेले नाही. भविष्यात काय संधी मिळते, ते बघू आणि पक्षश्रेष्ठींचा जो आदेश असेल त्याप्रमाणे कार्य करू,” असं त्यांनी सांगितलं.