बोलेरो आणि ट्रकची जोरदार टक्कर, भंडारा जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू
Bhandara News: महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ते अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा शहराजवळील बेला गावात काल रात्री हा भीषण अपघात झाला. रायपूरहून नागपूरला जाणारी बोलेरो जीप एका ट्रकला धडकली.
मिळालेल्या माहितीनुसार बोलेरो बेला गावाजवळ पोहोचली तेव्हा नागपूरकडून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने तिला धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. अपघात इतका भीषण होता की बोलेरोचे तुकडे तुकडे झाले आणि त्यात बसलेल्या पाचपैकी चार जणांचा जागीच मृत्यू झाला. बोलेरोचा चालक सुदैवाने बचावला असला तरी तोही गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. व अपघातात जखमी झालेल्या चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस पुढील कारवाई करत आहे.
Edited By- Dhanashri Naik