सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभर रस्ते विकासाची कामे मोठ्या जोमात सुरू आहेत. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात विविध महामार्गांची कामे प्रगतीपथावर असून यामध्ये महाराष्ट्रात देखील जवळपास 15 नवीन महामार्ग तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
यात काही महामार्गाची कामे सुरू झाली आहे तर काही महामार्गांची कामे सुरू होण्यात आहेत. यामध्ये मुंबई ते नागपूर दरम्यान असलेल्या समृद्धी महामार्गाचे जवळपास 70 टक्के काम पूर्ण झाले आहे.
विशेष बाब म्हणजे या महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी हा गेल्यावर्षीच खुला झाला आहे. तसेच या मार्गाचा दुसरा टप्पा अर्थातच शिर्डी ते भरवीर हा या चालू महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान या महामार्गाचे संपूर्ण काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचा टारगेट राज्य रस्ते विकास महामंडळाने ठेवले आहे. या महामार्ग व्यतिरिक्त राज्यात इतरही अनेक महामार्ग प्रस्तावित आहेत आणि त्यांची कामे जोमात सुरू आहेत. आज आपण याच महामार्गांसंदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या महामार्गांची कामे आहेत सुरु
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग : या महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटरचा तसेच शिर्डी ते भरविर हा 80 किलोमीटरचा टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. या महामार्गाची एकूण लांबी 701 किलोमीटर असून उर्वरित 100 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे.
दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे हा राजधानी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई यांना कनेक्ट करणारा देशातील एक अतिशय महत्त्वाचा महामार्ग आहे. हा एक आठ पदरी महामार्ग असून महाराष्ट्रात या महामार्गाची लांबी जवळपास 170 किलोमीटर एवढी आहे.
जालना-नांदेड समृद्धी महामार्ग कनेक्टर :- जालना ते नांदेड हा 179 किलोमीटर लांबीचा महामार्ग विकसित केला जाणारा जो. हा महामार्ग सहा पदरी राहणार असून समृद्धी महामार्गाला कनेक्ट केला जाणार आहे. यामुळे मराठवाड्याची विदर्भासोबत कनेक्टिव्हिटी आणखी सुधारणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या महामार्गाच्या बांधकामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. निश्चितच या महामार्गाचे काम देखील जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
नागपूर-गोवा शक्तिपीठ एक्सप्रेस वे :- नागपूर ते गोव्यादरम्यान महामार्ग विकसित केला जाणार आहे. हा महामार्ग समृद्धी महामार्गापेक्षा अधिक लांबीचा महामार्ग राहणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील हा सर्वाधिक लांबीचा महामार्ग बनेल असा दावा केला जात आहे. या महामार्गाची लांबी 760 किलोमीटर राहणार असून हा एक सहा पदरी महामार्ग राहणार आहे. या महामार्गाच्या डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टसाठी सध्या ग्राउंड वर्क सुरू असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. या महामार्गाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा महामार्ग राज्यातील तीन शक्तीपीठांना कनेक्ट करणार आहे. याव्यतिरिक्त हा महामार्ग राज्यातील इतरही अन्य प्रमुख तीर्थस्थळांना जोडणारा महामार्ग राहणार असून याच कारणाने याला शक्तीपीठ एक्सप्रेस वे असं संबोधलं जात आहे.
पुणे-छत्रपती संभाजीनगर ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे :- मराठवाड्याची पश्चिम महाराष्ट्रासोबत कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान ग्रीन फील्ड कॉरिडोर विकसित करण्याचा प्लॅन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या महामार्गाची लांबी 225 किलोमीटर राहणार असून हा एक सहा पदरी महामार्ग राहील. सध्या या महामार्गासाठी भूमी अधिग्रहणाचे काम जोमात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी लवकरच निविदा देखील काढल्या जाणार आहेत.
चिरले ते पत्रादेवी कोकण एक्सप्रेस वे :- मुंबई-गोवा एक्सप्रेस वे आणि चिरले ते पत्रा देवी कोकण एक्सप्रेस वे कोकणवासीयांसाठी अतिशय महत्त्वाचे महामार्ग राहणार आहेत. यामुळे कोकणाची कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. हा कोकण एक्सप्रेस वे जवळपास 500 किलोमीटर लांबीचा आणि सहा पदरी राहणार आहे. सध्या या प्रकल्पासाठी ग्राउंड सर्वे सुरू असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडोर :- या महामार्गाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा राज्यातील पहिला 14 पदरी महामार्ग राहणार आहे. याची लांबी ही जवळपास 126 किलोमीटर राहणार आहे. यामुळे विरार ते अलिबाग दरम्यानचा प्रवास सुसाट होण्यास मदत होणार असून मुंबई उपनगरातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यास या मार्गाचा मोलाचा वाटा राहणार आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्यासाठी निविदा मागवण्यात आली असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.
पुणे बेंगलोर एक्सप्रेस वे :- हा सातशे किलोमीटर लांबीचा आठ पदरी महामार्ग राहणार आहे. यामुळे पुणे ते बेंगलोर दरम्यान चे कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत होणार आहे. या महामार्गासाठी देखील लवकरच टेंडर मागवले जाणार आहेत.
पुणे-नाशिक एक्सप्रेस वे :- मध्य महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहरे अर्थातच पुणे आणि नासिक या महामार्गाने कनेक्ट होणार आहेत. पुणे शिक्षणाचे माहेरघर म्हणून जगात ख्याती प्राप्त आहे तर नासिक एक महत्त्वाची कृषी बाजारपेठ आहे. यामुळे हे दोन्ही शहरे कनेक्ट करण्यासाठी 180 किलोमीटर लांबीचा 6 पदरी महामार्ग विकसित केला जाणार आहे. सध्या या महामार्गासाठी ग्राउंड सर्वे सुरू असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
सुरत-चेन्नई ग्रीन फील्ड महामार्ग : या चारशे किलोमीटर लांबीच्या सहा पदरी महामार्गासाठी महाराष्ट्रात सध्या भूमी अधिग्रहणाचे काम सुरू आहेत. मात्र या महामार्गाला सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. दरम्यान या महामार्गाच्या काही भागांसाठी निविदा मागवण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूर-विजयवाडा महामार्ग : नागपूर आणि विजयवाडा हे दोन महत्त्वाचे शहरे जोडण्यासाठी महामार्ग विकसित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या महामार्गासाठी सध्या भूमीअधिकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.
नागपूर-गोंदिया महामार्ग : राज्याची उपराजधानी नागपूर आणि गोंदिया ही शहरे जोडण्यासाठी महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. या महामार्गामुळे विदर्भातील ही दोन्ही महत्त्वाची शहरे परस्परांना कनेक्ट होणार असून विदर्भातील एकात्मिक विकासाला यामुळे गती मिळणार असल्याचा दावा केला जातो.
नागपूर-गडचिरोली : नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी हा महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्याचा विकास सुनिश्चित होणार असून नागपूर ते गडचिरोली हा प्रवास गतिमान होणार आहे.
गोंदिया-गडचिरोली महामार्ग : विदर्भातील आणखी दोन महत्त्वाची शहरे गोंदिया आणि गडचिरोली परस्परांना कनेक्ट करण्यासाठी महामार्गाची निर्मिती होणार आहे. या महामार्गाच्या डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट वर सध्या काम सुरू आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor