1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (22:59 IST)

चला विठू दर्शनाला, मात्र दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना करोना नियमांचे पालन बंधनकारक

पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुख्मिणी मातेच्या भाविकांना  ७ ऑक्टोबर पासून दररोज दहा हजार भाविकांना विठुरायाचं मुखदर्शन घेता येणार आहे. मात्र, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना करोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व खबरदारी समितीने घेतली असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे. मंदिर समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
 
या बैठकीत सरकारचे करोना बाबतचे सर्व नियमाचे पालन करण्यात येणार आहे. वय वर्षे दहा वर्षाच्या आतील, ६५ वर्षापुढील, गर्भवती महिला यांनी दर्शनासा येण्याचे टाळावे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे तापमान तपासले जाणार आहे. तसेच दर्शन रांगेत भाविकांनी मुखपट्टी,योग्य अंतर, सॅनिटायझर आदी नियम बंधनकारक आहे. तसेच आरोग्य यंत्रणा सतर्क राहणार आहे. मंदिर भाविकांसाठी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत खूले राहणार आहे. यात दररोज सकाळी ६ ते ७ या वेळेत स्थानिक भाविकांना,नवरात्रोसत्वात महिलांना याचा लाभ घेता येईल.
 
दि ७ ऑक्टोबरपासून दर्शनासाठी http://www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावरून तारीख, वेळ निश्चित करता येईल. तसेच इथे आल्यावर मुख दर्शनाची रांग कासार घात येथून सुरु होणार आहे. त्या ठिकाणाहून दर्शन घेता येईल. तसेच मंदिरात दर्शनासाठी येताना हार, फुले, नारळ, प्रसाद घेवून जाण्यास बंदी केली आहे. मंदिर, दर्शन रांग वेळोवेळी फवारणी आणि स्वच्छ केले जाणार असल्याची माहिती गुरव यांनी दिली आहे. तसेच मंदिरातील सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. 
 
देवाचे नित्योपचार सर्व ज्या त्या वेळेनुसार आणि परंपरेनुसार होणार. भाविकांनी संकेतस्थळावरून बुकींग करून, अथवा समक्ष येऊन दर्शनाला यावे. मात्र गर्दी करू नये. मंदिर समितीने भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेतली आहे. येणाऱ्या भाविकांनी देखील सरकारच्या नियमाचे पालन करावे. जर कोणाला काही त्रास झाल्यास मंदिर समितीला सांगावे त्वरित वैद्यकीय मदत केली जाईल.