शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

सामनाच्या संपादकीयमधून भाजपावर निशाणा

जिल्हा परिषद निवडणुकामध्ये देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या नाकावर टिच्चून तेथे काँग्रेसने मुसंडी मारली आहे.  महाराष्ट्रातील सत्ता हेच भाजपचे ‘टॉनिक’ होते. ते टॉनिकच संपल्यामुळे बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे. कुठे शिवसेना, कुठे राष्ट्रवादी तर कुठे काँग्रेस आणि वंचित आघाडीची सरशी झाली आहे. जिल्हा परिषदांचा कौल स्पष्ट आहे. सहापैकी पाच जिल्ह्यातून भाजपला नाकारण्यात आले. भाजप आता काय करणार? असं शिवसेनं म्हटलं आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून भाजपावर निशाणा साधला आहे.
 
धुळे वगळता भाजपच्या चेहऱ्यावरील ‘मेकअप’ उतरला. सत्तेमुळे आलेली ही लाली सत्ता जाताच उतरली. ज्याच्या हाती बऱ्यापैकी सत्ता असते त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांत विजय होतो. राज्यात सत्ताबदल झाल्याची तुतारी सहा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निकालांनी फुंकली आहे. नंदुरबारची सत्ता भाजपने गमावली आहे. त्याचे नैराश्य इतके की, अक्कलकुवा येथील शिवसेनेच्या कार्यालयावर हल्ला घडवून जाळपोळ करण्यापर्यंत त्यांच्या भाडोत्री गुंडांची मजल गेली.
 
या सर्व जिल्हा परिषदांवर कालपर्यंत भाजपची सत्ता होती, पण महाराष्ट्राची सत्ता गमावल्याने जिल्हा परिषदाही रिकाम्या झाल्या. कुठे शिवसेना, कुठे राष्ट्रवादी, तर कुठे काँग्रेस आणि वंचित आघाडीची सरशी दिसत आहे. पण धुळे वगळता भाजप कुठेच नाही. सगळ्यात धक्कादायक आणि सनसनाटी निकाल लागला आहे तो नागपूर जिल्हा परिषदेचा. देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या नाकावर टिच्चून तेथे काँग्रेसने मुसंडी मारली आहे. भाजपचा दारुण पराभव फडणवीस, गडकरींच्या गावातच झाला. शिवसेना काँग्रेसच्या रंगात रंगली असून भगवा रंग विसरली असल्याची गरळ गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वीच ओकली होती. पण नागपूर हा त्यांचा बालेकिल्ला असतानाही फडणवीस-गडकरी तेथील भाजपचा पराभव का थांबवू शकले नाहीत? याचे कारण एकच, ग्रामीण भागातील जनता तुमच्या रोजच्या ‘बकवास’ थापेबाजीला कंटाळली आहे. विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने नागपुरात मुसंडी मारलीच होती व आता जिल्हा परिषदही भाजपकडून हिसकावून घेतली.