शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 एप्रिल 2022 (08:27 IST)

गं.द.आंबेकर जीवन व श्रम गौरव पुरस्कार जाहीर; डॉ.डी.एल.कराड यांना जीवन गौरव तर किरण भावसार श्रमगौरव साहित्य पुरस्कार

राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी दरवर्षी देण्यात येणारे कामगार महर्षी गं.द.आंबेकर जीवनगौरव व श्रमगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले. सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्यस्तरीय अध्यक्ष तसेच अनेक संघटित-असंघटित कामगार संघटनांचे नेते ज्येष्ठ कामगारनेते नाशिकस्थित डॉ.डी.एल.कराड यांची जीवन गौरवसाठी निवड झाली आहे.
 
संघटनेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी वरील प्रमाणे पुरस्कारांची घोषणा केली. औद्योगिक क्षेत्रातील अन्य पाच आंबेकर श्रमगौरव पुरस्कारांचे मानकरी असे आहेत.१) हमाल माथाडी कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष औरंगाबादचे साथी सुभाष लोमटे यांना ग्रामीण शेतमजूर आणि कष्टकऱ्यांचे निरंकुश संघटनकार्य केल्याबद्दल सामाजिक विभागातून श्रमगौरव पुरस्कार मिळणार आहे.२)सिन्नर येथील ॲडव्हान्स्ड एन्झाइम टेक्नॉलॉजीज लि. मधील कामगार, प्रतिथयश लेखक किरण भावसार यांना श्रमगौरव साहित्य पुरस्कार मिळणार आहे. त्यांच्या बालकवितेचा इयत्ता दुसरीच्या पुस्तकात समावेश झाला असून त्यांच्या विविध पुस्तकांना महाराष्ट्रभर गौरविले गेले आहे. बालसाहित्यातील त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे.३)इंटकचे शामराव श्रीपाद कुळकर्णी यांना इचलकरंजी येथील यंत्रमाग क्षेत्रात उत्कृष्ट संघटन कार्याबद्दल कामगार चळवळ या विभागातून पुरस्कार मिळणार आहे.४)रायगड मधून महाराष्ट्र इंटकच्या संघटक ‘एसटी’ महिला वाहक कु.शिल्पा काकडे यांनी लघु चित्रपट लेखन, कविता लेखनाबरोबरच नाट्य अभिनयात लक्षणीय कामगिरी केली आहे.त्याबद्दल कला विभागातून त्यांना पुरस्कार मिळत आहे.५)उस्मानाबाद येथील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खोखो पटू ,अर्जुन पुरस्कार विजेत्या,राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय खोखो संघाचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या आणि शासकीय सेवेत सहाय्यकपदापासून सेवा करणाऱ्या कु.सारिका काळे यांना क्रीडा क्षेत्रातून आंबेकर श्रमगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, मानचिन्ह, शाल,श्रीफळ तसेच जीवनगौरवसाठी ५१ हजार तर श्रमगौरव पुरस्कार विजेत्यांसाठी प्रत्येकी ३५ हजार रुपयांचा धनादेश असा आहे. पुरस्कार सोहळा येत्या १ मे कामगार आणि महाराष्ट्रदिनी संपन्न होईल.