पठाणकोट हल्ल्यावेळी लष्कर पाठवण्यासाठी केंद्राने मागितले 7.5 कोटी-भगवंत मान
पठाणकोट हल्ल्यावेळी लष्कर पाठवण्याच्या बदल्यात केंद्र सरकारने पंजाब सरकारकडे 7.5 कोटी रुपयांची मागणी केली होती असा आरोप पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला आहे.
पठाणकोट एअरबेसवर हल्ला झाल्यानंतर लष्कर नंतर पोहोचलं. त्याआधी सरकारचं पत्र आलं की लष्कर पंजाबमध्ये पाठवण्यात आलं आहे. यामुळं पंजाबला 7.5 कोटी रुपये द्यावे लागतील असं मान यांनी सांगितलं. मी आणि आम आदमी पक्षाचे साधू सिंह संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे गेलो. त्यांना म्हणालो, आम्हाला मिळणाऱ्या संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजनेच्या निधीतून ही रक्कम कापून घ्या आणि या बदल्यात आम्हाला फक्त पंजाब, भारताचा भाग नाही, लष्कर भाड्याने घेत आहोत असं लिहून द्या असं मान म्हणाले.
1 जानेवारी 2016 रोजी पाकिस्तानच्या चार दहशतवाद्यांनी पठाणकोट एअरबेसवर हल्ला केला होता. यामध्ये सात भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला होता. 80 तास चकमक सुरू होती. प्रत्युत्तरात भारतीय लष्कराने केलेल्या हल्ल्यात चारही दहशतवाद्यांचा मृत्यू झाला.