शिवकालीन शस्त्र संग्राहक गिरीश जाधव यांचे निधन
ज्येष्ठ शस्त्र संग्राहक गिरीश लक्ष्मण जाधव यांचे मंगळवार सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जयसिंगपूर येथे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते.
त्यांनी राज्यभर फिरून शस्त्रांचा विपुल संग्रह केला होता. जाधव यांनी सुमारे ५० वर्ष महाराष्ट्रात फिरून शस्त्रांचा मोठा साठा निर्माण केला होता. शिवकालीन शस्त्र हा त्यांच्या अभ्यासाचा विषय राहिला. गिरीश जाधव हे मूळचे जयसिंगपूरचे. त्यांना महाविद्यालयीन दशेपासूनच शस्त्र संग्रहाचा छंद लागला होता. त्यासाठी त्यांनी कोल्हापूर भागातील किल्ले, गड येथे भ्रमंती केली होती.
ते पुणे येथे राहत असताना त्यांना मिळालेली कट्यार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दाखवली असताना त्यांनी ती शिवकाळातील असल्याचे सांगितले होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून शस्त्रसंग्रहाच्या छंदाची दिक्षाच जाधव यांनी घेतली होती. मुंबईतील कुर्ला भागात त्यांनी दीर्घकाळ वास्तव करताना शस्त्र संग्रह वाढवला.