तरुणांच्या हाती सूत्रं देणं काँग्रेसला महागात पडलं- सुशीलकुमार शिंदे
'तरुणांना पूर्ण नेतृत्व दिलं गेलं, तिथं आमची गफलत झाली, असं मला वाटतं. मात्र अशी मी पक्षावर थेट टीका करू शकणार नाही. आम्ही 10 वर्षांची सत्ता भोगल्याने आम्ही अॅक्टिव्ह नव्हतो. त्यामुळे संघटना बांधणी झाली नाही. एकट्या राहुल गांधीना दोष देणे शक्य नाही, पक्षात खळखळतं पाणी असलं पाहिजे. लोकांना बदल हवा होता," असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना त्यांनी नवजोतसिंग सिद्धू यांच्यावर ही भाष्य केलं आहे. ते म्हणाले, "नवज्योतसिंग सिद्धू हा काय राजकीय माणूस नाही, खेळात जसे प्रयत्न केले, तसे प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांसोबत जमवून घेतले नाही.''
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, "सध्या जात, धर्मावर सर्व राजकारण सुरू आहे. हे जास्त काळ चालणार नाही, सगळं बदलेल. लोक भाजपचा तिरस्कार करतील. देशाची आर्थिक स्थिती, उद्योग धंदे कमी होत आहेत. केवळ आकडे फुगवून चालणार नाही. काँग्रेसकडे हे भाजप पेक्षा वेगळं आहेत."