शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022 (14:36 IST)

पेनची मागणी केली आणि महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून पळाला

crime
नाशिक दुकानातील महिलेकडे नवीन पेनची मागणी केली आणि तो संबंधित महिलेच्या गळ्यातील आठ ग्रॅमची सोनसाखळी ओरबाडून पळाला. ही घटना आडगाव शिवारात घडली. यावेळी चोरट्याने गळ्यावर हात टाकताच महिलेने त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो झटका देऊन पळून गेला.
 
मिळालेल्या माहितीनुसार, शरयू पार्क परिसरात असलेल्या ओमकार बंगल्यात एक छोटेसे किराणा दुकान आहे. सोमवारी (दि. ३) रात्री आठ वाजताच्या सुमारास मीनाक्षी दिनकर ठाणगे या नेहमीप्रमाणेच दुकानात बसलेल्या होत्या. यावेळी एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एका संशयिताने दुकानात येऊन नवीन पेन मागितली. तेव्हा ठाणगे पेन काढण्यासाठी मागे फिरल्या असता, चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली. यावेळी साखळी अर्धी तुटल्याने त्याने अर्धा भाग सुमारे २० हजार रुपये किमतीचा घेऊन पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी झालेल्या झटापटीत फिर्यादी ठाणगे यादेखील जखमी झाल्या. त्यांच्या गालावर व डोळ्याजवळ दुखापत झाली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वार चोरांविरुद्ध जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited by: Ratnadeep Ranshoor