शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (15:43 IST)

Golden Stone : शेतात आकाशातून पडला 2 किलोचा सोनेरी दगड, उल्कापात असल्याची माहिती

आकाशातून चक्क सोनेरी दगड पडल्याची आश्चर्यकारक घटना उस्मानाबाद जिल्ह्यात घडली आहे. एका शेतात आकाशातून सोनेरी दगड पडला. 
 
उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यात शुक्रवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास संबंधित शेतकरी आपल्या शेतात काम करत असताना अचानक दोन किलो वजनाचा सोनेरी रंगाचा दगड पडला. शेतकरी काम करत असताना अवघ्या ७ ते ८ फुट अंतरावर हा दगड पडला. हा दगड सध्या तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. प्रभू निवृत्ती माळी नावाच्या शेतकऱ्याच्या शेतात हा दगड पडला आहे.
 
नेमकं काय घडलं? 
उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरु असल्यामुळे माळी आपल्या शेतात पाऊसामुळे किती पाणी साचलं आहे हे बघण्यासाठी साडेसहाच्या सुमारास शेतात गेले होते. दरम्यान त्यांना अचानक कसलातरी जोरदार आवाज आला. काही कळायच्या आतच माळी उभे असलेल्या ठिकाणापासून सुमारे आठ फुटाच्या अंतरावर आकाशातून दोन किलो ३८  ग्रॅम वजनाचा सोनेरी दगड पडल्याचे निदर्शनास आले. कधी न पाहिलेला दगड पाहून माळी देखील चांगलेच हैराण होते. त्यांनी तत्काळ अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली तर सध्या हा दगड तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे.
 
घडलेल्या घटनेमुळे माळी खूप घाबरले होते. त्यांनी तातडीने तहसील कार्यालयात याची माहिती दिली. तहसील कार्यालयाकडून या दगडाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर हा दगड उस्मानाबाद येथील भारतीय भूवैज्ञानिक विभागाकडे पाठवण्यात आला होता. हा दगड उल्कापात असल्याची माहिती भूवैज्ञानिकांनी दिली आहे. दगड ७ इंच लांब असून ६ इंच रुंद आहे. तर वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार याची जाडी साडेतीन इंचापेक्षाही जास्त आहे.