सोमवार, 26 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 4 नोव्हेंबर 2021 (15:13 IST)

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कार्तिकी वारीला परवानगी

सोलापूर- कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदाच पंढरीच्या पांडुरंगाची कार्तिकी वारी १५ नोव्हेंबरला होणार आहे. यावेळी मोठी गर्दी अपेक्षित असल्यानं जिल्हा प्रशासनानं आपत्ती व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं वारीसाठी स्वतंत्र परवानगीची गरज भासणार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं आहे.
 
आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघ या प्रमुख चार वारींच्या निमित्ताने दरवर्षी पाच ते दहा लाखांपर्यंत भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल होतात. मात्र, राज्यातील कोरोनाच्या संकटामुळे 17 एप्रिल 2020 पासून श्री विठ्ठलाची एकही वारी भाविकांच्या उपस्थितीत होऊ शकली नाही.
 
कोरोनाच्या दोन्ही लाटेत आषाढी वारीच्या निमित्तानं मानाच्या पालख्या एसटी बसेसमधून पंढरीत दाखल झाल्या होत्या. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. लसीकरण मोहिम वेगानं सुरू आहे. राज्यात ७ कोटींहून अधिक जणांना लस देण्यात आलेली आहे. त्यामुळे यंदाची वारी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. 
 
दरवर्षीप्रमाणे वारी करण्यास राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.